प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत आता प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र 

0
6

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 511 गावात दृकश्राव्य प्रणालीद्वारे होणार उदघाटन

         गोंदिया दि.18 : ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्यासमवेत नवीन तंत्रकुशलतेची जोड देऊन प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र राज्यातील 511 गावात सुरू होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दृकश्राव्य प्रणालीद्वारे केला जाणार आहे. राज्यातील या 511 केंद्रापैकी गोंदिया जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र सुरू होत आहेत.

         ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी व्हावे हा उद्देश प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामागे निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पारंपारिक कौशल्यासह नवीन रोजगाराची क्षेत्र तपासून त्या अनुरूप त्यांना तंत्र कौशल्य मिळावे त्यासाठी या केंद्रात विविध प्रशिक्षण व कार्यानुभव दिला जाईल.

         गोंदिया जिल्ह्यातील भिमराव होळीराम राऊत ठाणा तालुका आमगाव, रुखमा महिला महाविद्यालय नवेगावबांध तालुका अर्जुनी मोरगाव, ग्रामपंचायत कार्यालय मिसपीरी तालुका देवरी, श्री. शिवशंकर मंदिर ट्रस्ट नागरा तालुका गोंदिया, बी.जी. कटरे कोहमारा रोड मुंडीपार तालुका गोरेगाव, लोहिया शाळेच्या मागे दि सहकारी भात गिरणी मर्यादित सौंदड तालुका सडक अर्जुनी, कावराबांध स्किल सेंटर सालेकसा रोड कावराबांध तालुका सालेकसा व सुनील भक्तराज लोहिया वडेगाव तालुका तिरोडा या ठिकाणी सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

          तरी जिल्ह्यातील युवकांनी नियोजित ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं.210, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष भेटावे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.