गडचिरोली: जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) १२ व्या सराव पेपरचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परीक्षेत जिल्ह्यातील ७४ वाचनालयांमधून ४,३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन आणि सराव मिळावा, या उद्देशाने पोलीस दादालोरा खिडकी व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. आज पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडु आलाम सभागृहासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्र स्तरावरील ७४ वाचनालयांमध्ये ही परीक्षा पार पडली.
दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्याथ्र्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र, पेनगुंडा हद्दीतील 12, पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील 15, व पोस्टे वांगेतुरी हद्दीतील 15 विद्याथ्र्यांनी ही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. तसेच ‘एक गाव एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत दि. 09 डिसेंबर 2025 रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय, गर्देवाडा येथे घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत 08 विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला. अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. पोलीस मुख्यालय परिसरात घेण्यात आलेल्या सराव पेपरमध्ये 2553 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





