ज्योती, नेहा ठरल्या वक्तृत्व करंडकाच्या मानकरी

0
16

गोंदिया दि.८: जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून सडक-अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती आसाराम नंदेश्‍वर तर कनिष्ठ महाविद्यालय गटातून सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगावची नेहा भास्कर कापगते प्रथम आली. त्यांची राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दोन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद गोंदियातर्फे स्थानिक स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी (दि.५) स्पर्धा पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील २८ विद्यार्थी सहभागी झाले. याच स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून तिरोडा येथील सी.जे. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुनिता चौधरी द्वितीय तर न.मा.द. महाविद्यालयाची विद्यार्थिनी शीतल मांदाडे तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली.

कनिष्ठ महाविद्यालय गटातून अरुणनगर येथील नूतन कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी चंपा परिमल विश्‍वास द्वितीय तर देवरी येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यांना अनुक्रमे सात व पाच हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर दोन्ही गटातून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे साधन व्यक्तींचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी, प्रा. डॉ. चंद्रकुमार राहुले, माजी प्राचार्य तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक गेडाम, विधी विभागाचे विभागप्रमुख अँड. सुयोग इंगळे, झामेश ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे अधीक्षक एच.व्ही. गौतम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जितेंद्र येरपुडे, शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद रहांगडाले, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे,माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर, स्वच्छता तज्ज्ञ सूर्यकांत रहमतकर, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी, सनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ विशाल मेश्राम, शोभा फटिंग, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ तृप्ती साकुरे, वित्त व संपादणूक अधिकारी छाया शहारे, सचिन रोडी, रमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले.