बोंडगाव देवी चा आनंद नाकाडे गाजवितो झाडीपट्टी रंगभूमी

0
20

दीड हजार नाटकात भूमिका साकारल्या= खलनायकाच्या भूमिकेने झाडीपट्टीत ओळख 
अर्जुनी मोर.-सुरेंद्रकुमार ठवरे– भंडारा ,गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर हे पूर्व विदर्भातील चार जिल्हे झाडीपट्टी रंगभूमीसाठी सर्वदूर परिचित आहेत. यामध्ये वडसा देसाईगंज व सिंदेवाही ही शहरे रंगभूमीची सेवा करण्याचे केंद्र बनले आहे. या रंगभूमीला एकूणच दीडशे वर्षाची परंपरा लाभली आहे .या चार जिल्ह्याच्या मातीत अनेक कलावंतांनी जन्म घेऊन या रंगभूमीवर नानाविध प्रयोग करून आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. याच रंगभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी चा 42 वर्षीय आनंद नाकाडे आपल्या अभिनय कौशल्याने विविध नाटकात वेगवेगळ्या भूमिका साकारतो आहे. आज पर्यंत दीड हजाराचे वर नाटकात विविध प्रकारच्या भूमिका सादर करणारा हा नटवर्य खलनायकाच्या भूमिकेसाठी झाडीपट्टी रंगभूमीवर आपला ठसा उमटवत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथील आनंद नाकाडे यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड आहे .शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात वयाच्या बाराव्या वर्षापासूनच काम करण्यास सुरुवात झाली .आणि मग गावात होणाऱ्या नाटकांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. अष्टपैलू नाट्य कलावंत असलेला आनंद नाकाडे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात पहिल्यांदा वयाच्या चौदाव्या वर्षापासून गणेश हिर्लेकर लिखित संगीत “जिव्हाळा” या नाटकापासून केली .बोंडगाव देवीच्या गाव कलाकारांसोबत “पेटलं सारं गाव ,विझव बाबुराव “या नाटकातील बाबुरावच्या भूमिकेमुळे त्यांची खरा नाट्य कलावंत म्हणून ओळख पटली. त्यांचे अष्टपैलू नाट्यकलावंत म्हणून आपल्या अभिनय कौशल्याने झाडीपट्टी रंगभूमी देसाईगंज वडसा येथे प्रवेश मिळविला. पहिल्यांदा जय दुर्गा नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसामध्ये खलनायकाच्या अभिनयासाठी संधी मिळाली. दमदार आवाज व अभिनय कौशल्याचे बळावर त्यांनी झाडीपट्टी रंगभूमी मधे आपला जम बसविला. त्यांनी पहिल्यांदाच जय दुर्गा नाट्य रंगभूमी च्या मंचावरून दोन वर्षात दीडशे ते 200 नाट्यप्रयोग केले. त्यानंतर प्रल्हाद नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा यामध्ये भूमिका साकारल्या, त्यानंतर गणराज कलारंगभूमी सिंदेवाही वडसा इथेही सतत तीन वर्ष 200 ते 250 चे वर नाटकात विविध भूमिका साकारल्या, आनंद नाकाडे यांचे मधला असलेला कलावंत पाहून अनेक नाट्य रंगभूमीच्या आफर येऊ लागल्या. आता सतत सहा वर्षापासून धनंजय स्मृती रंगभूमी देसाईगंज वडसा येथे आपल्या अभिनयाची छाप पडत आहे जवळपास 600 च्या वर नाट्यप्रयोगातून चरित्र नट व खलनायकाच्या भूमिका साकारत आहे. नाट्य क्षेत्रात सर्वात खलनायकाची भूमिका ही आधारस्तंभ आहे धनंजय स्मृती नाट्य रंगभूमी मध्ये” फाटका पदर मायेचा” या नाटकाचे 250 चे वर प्रयोग झाले असून यामध्ये अशोक भंडारी ही भूमिका आतापर्यंत अविस्मरणीय ठरली असल्याचे आनंद नाकाडे यांनी सांगितले, सध्या झाडीपट्टीमध्ये धनंजय स्मृती रंगभूमी मध्ये “साता जन्माच्या गाठी “या नाटकात कलेक्टरची भूमिका प्रचंड गाजत असल्याचेही आनंद नाकाडे यांनी सांगितले. झाडीपट्टी रंगभूमीच्या मंचावर सामाजिक नाटकात काम करीत असताना ऐतिहासिक व पौराणिक नाटकातही काम करण्याची संधी मिळाली त्यात सर्वाधिक “व्यंकोजी वाघ” या नाटकात भूमिका साकारल्या, धनंजय स्मृती नाट्य मंडळात काम करीत असताना मराठी चित्रपट अभिनेते रमेश भाटकर, मोहन जोशी, कुलदीप पवार या महान अभिनेत्यांसोबत झाडीपट्टीच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे मार्गदर्शन आपल्या अभिनयासाठी मोलाचे ठरले असल्याचे आनंद नाकाडे यांनी सांगितले. असा हा अष्टपैलू कलावंत आनंद नाकाडे आपल्या अभिनय कौशल्याने झाडीपट्टी रंगभूमीवर बोंडगाव देवी गावचे नाव गाजवतो आहे या कलाकाराला पुढील यशासाठी शुभेच्छा….