सिंदीपारवासीयांनी बांधले श्रमदानातून दोन बंधारे

0
10

देवरी दि. १४ – : तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील जेठभावडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सिंदीबिरी येथील नागरिकांनी गुरूवारी (दि.१२) विशेष ग्रामसभेत पूर्णपणे पॉलिथीन बॅग वापरण्यावर बंदी घालण्याची शपथ घेतली. सदर ग्रामपंचायत आता ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत सहभागी झाली आहे.सरपंच डॉ.जितेंद्र रहांगडाले यांच्या पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून ग्रामपंचायतच्या हद्दीतील गोंडीटोला व मसुरभावडा येथे श्रमदानातून दोन बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

सविस्तर असे की, जेठभावडाचे सरपंच रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेत उपस्थित सर्व लोकांनी ग्राम विकासाकरिता आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, याकरिता लागेल ते सहकार्य करण्यास आमची पूर्ण तयारी आहे, असे आश्वासन दिले. यातूनच सिंदीबिरी येथील लोकांनी श्रमदानातून गोंडीटोला व मसूरभावळा या ठिकाणी दोन पाण्याच्या बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण केले.

या कामात सरपंच डॉ.रहांगडाले, सुखीतराम किराईबोईर, फुलबत्ती भिराईबोईर, ओमराज करंडे, तारा करंडे, योगराज भक्ता, जागेतीन भक्ता, देवप्रसाद भक्ता, झनकलाल किराईबोईर, दसरी किराईबोईर, दिलीप चौरे, रायभान साखरे, हरिचंद साखरे, शेषराव किरसान, संतोष भक्ता व रोहीत बुढाझालीया आदिंनी सहकार्य केले. या विशेष ग्रामसभेत पूर्ण गावात प्लास्टिक पॉलिथीनवर बंदी घालण्याचे अभियान चालविण्याची शपथ सर्व लोकांनी घेतली. अशा प्रकारे सदर ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी झाली आहे.