जिल्ह्यातील तलावांवर देशी-विदेशी पक्ष्यांची मांदियाळी

0
16

गोंदिया,berartimes.com दि.2 –: -तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात येथील तलावावर दरवर्षी हजारो किलोमीटर प्रवास करून येणार्‍या देशी व विदेशी पक्षांचे वास्तव्य मानाचा तुरा ठरतो. यंदाही मोठय़ा संख्येने विविध प्रजातींचे पक्षी जिल्ह्यात आल्याचे नुकत्याच झालेल्या पक्षी गणनेत आढळून आले.
पर्यावरण संतुलनामध्ये पृथ्वीवरील जैविक व अजैविक घटकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. जैविक घटकांमध्ये पक्ष्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. नैसर्गिक रूपाने जंगल व जैवविविधता वाढविण्यात पक्षी महत्वाची भूमिका निभावतात. पक्षी हे वनस्पतींचे नैसर्गिक वाहक असून पर्यावरण संतुलनात त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरते.हिवाळय़ात हजारोच्या संख्येने देशी व विदेशी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यातील तलावांवर खाद्यान्नाच्या शोधात येतात.यात प्रामुख्याने देशी पक्ष्यांसोबत सायबेरिया, चीन, मंगोलिया, अफगानीस्तान व संपूर्ण युरोप खंडातून येणार्‍या पक्षांचा समावेश असतो. जिल्ह्यातील तलावांमध्ये असलेले विपूल खाद्यान्न व पोषक वातावरणच या पक्ष्यांना आपल्याकडे खेचून आणतात. हजारोंच्या संख्येने येणारे हे पक्षी जिल्ह्यातील जैवविविधतेचे सूचक आहे.
यंदा २९ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पर्यावरण संतुलन तथा वन्यजीव संरक्षणाचे कार्य करणारी ‘सेवा’ या संस्थेच्या मार्गदर्शनात वनविभाग, पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणार्‍यासंस्था, पक्षीप्रेम व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील तलावांवर पक्षी निरीक्षक केले. यात परसवाडा, झिलमिली, लोहारा, झालिया, नवतलाव(कुम्हारटोली), माकडी, बाजारटोला, शिवनी, घिवारी, कटंगी, सलंगटोला, घुर्मरा (कलपाथरी), चोरखमारा, करटी आदी तलावांवर पक्षी गणना करण्यात आली.या गणनेदरम्यान, तलावांवर देशी पक्ष्यांमध्ये सारस, कॉमन कुट, पर्पल मोरहेन, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, पॉंड हेरॉन, लेसर व्हीसलिंग डक, लिटल कारमोरट, कॅटल इग्रेट्स, व्हाईट थ्रोटेट किंगफिशर, कॉमन किंगफिशर, पाईड किंगफिशर आदींचा समावेश आहे. तर विदेशी पक्ष्यांमध्ये ग्रेलॅग गुज, नॉर्दम पिटेल, गडवाल, कॉमन क्रेन, रेड क्रेस्टेड पोचार्ड, युरेशियन विजन, कॉंब डक, फेरूजिनस पोचार्ड, ब्लॅड हेडेड आईबिज, कॉमन पोचार्ड, टफटेल डक, कॉमन टील, ज्ॉक स्नाईप, पेंटेड स्नाईप, युरेशियन मार्श हॅरिअर, स्टेपी इगल, लेसर स्पॉटेल इगल, बोनेलिस इगल, ग्रे हेडेड लॅपविंग आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील विविध तलावावर पक्षी गणनेकरिता भरत जसानी, सावन बहेकार, मुनेश गौतम, दुष्यंत रेंभे, रावणवाडीचे ठाणेदार संजीव गावडे, देवरीचे ठाणेदार तटकरे, परिहार, चेतन जसानी, शशांक लाडेकर, दुष्यंत आकरे, किास फरकुंडे, कन्हय्या उदापुरे, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, जैपाल ठाकूर, दीपक मुंदडा, रविंद्र (पिंटू) वंजारी, रूचिर देशमुख, स्वाती डोये, गुलशन रहांगडाले, सलीम शेख, रतीराम क्षीरसागर, राहुल भावे, मंगलेश डोये, दिनेश नागरीकर, झनकलाल रहांगडाले, मधुसुदन डोये, प्रशांत डोंगरे, राकेश डोये आदींनी सहकार्य केले.