आंबेडकरी तत्त्वज्ञान वंचितांसाठी मुक्तीचे महाद्वार

0
21

यवतमाळ,berartimes.com दि.२७: समाजपरिवर्तनाचे तत्त्वज्ञान स्वीकारणे म्हणजे आंबेडकरी विचार होय. अखिल जगतातील जो-कोणी असा विचार नि आचार आत्मसात करणारा असेल तो आंबेडकरी होय. ‘आंबेडकरी’ हा शब्द एका महान तत्त्वज्ञानापाशी येऊन थांबला आहे. हे आंबेडकरी तत्त्वज्ञान जगभरातील सर्वच पीडित, शोषित, वंचित घटकांसाठी मुक्तीचे महाद्वार बनले आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड यांनी केले.सनातनी ब्राह्मणी आणि आंबेडकरी तत्त्वज्ञान असा मूल्यसंघर्ष आहे. यापुढे ‘आंबेडकरी’ असणे म्हणजे ‘वी आर सुपेरिअर’ हा विचार आपल्या मनात वृद्धिंगत व्हावा, असे मत डॉ. बनसोड यांनी व्यक्त केले.सातव्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे उद््घाटन कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते रविवारी संदीप मंगल्ममध्ये थाटात पार पडले. विशेष अतिथी म्हणून ‘पुण्य नगरी’च्या मुख्य संपादक राही भिडे, सिनेअभिनेता मिलिंद शिंदे, डॉ. महेंद्र भवरे, डॉ. श्यामल गरुड, प्रा. सतेश्‍वर मोरे, प्रा. माधव सरकुंडे, रेखा भवरे, सिद्धार्थ मोकळ, स्वागताध्यक्ष नंदकुमार रामटेके आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
डॉ. बनसोड म्हणाले, जागतिकीकरणानंतरच्या धोरणात आजच्या पिढीची चहूबाजूंनी मुस्कटदाबी केली. नव्या अर्थनीतीने आमच्या जगण्याचे प्राधान्यक्रम बदलले. चळवळी तथाकथित एनजीओंनी गिळंकृत केल्याने अन्यायाची शृंखला सुरू असल्याचे टीकास्त्र सोडले.राज्यात पहिल्या महिला मुख्य संपादक होण्याचा मान राही भिडे यांना जात असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. शाल, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.नेत्यांवर होणारी टीका ही कुत्सितपणे आणि जातीय अहंकारातून होते. त्यामुळे आपोआपच आंबेडकरी समाजाचेही नैतिक खच्चीकरण करण्याचा त्यांचा डाव साधला जातो. ‘रिपब्लिकन ऐक्य’ हा समाजासाठी भावनिक अस्मितेचा मुद्दा आहे. मात्र, जर ऐक्य होत नसेल तर ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’तरी तयार होऊ शकतो की नाही? या मुद्याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. ही जबाबदारी युवकांनी पार पाडावी, अशी अपेक्षा डॉ. बनसोड यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वच नागरिकांना जीवन जगण्याचे अधिकार बहाल केलेत. त्यांचे विचार सर्वसमावेशक असताना विद्वान मंडळींची चिकित्सा नेमकी जाते तरी कुठे, हा प्रश्न नेहमीच पडतो. परंपरावाद्यांवर धर्माचा असलेला पगडा जास्त घातक ठरतोय, असे विचार राही भिडे यांनी व्यक्त केले. उद््घाटन सत्रात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जगण्यातले संदर्भ साहित्यात आल्यास पुढील पिढी उभी राहील. सामान्यांची जगण्याची धडपड अजूनही संपली नाही. जागतिकीकरणात वेशीबाहेरचा माणूस भरडल्या जातोय, याकडे साहित्यिकांनी लक्ष देण्याची गरज प्रतिपादित केली.
प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद शिंदे ओघवत्या शैलीत म्हणाले, भूमिका करणारे अनेक नट आहेत. मात्र मी ठराविक ‘भूमिका’ असणारा नट आहे. अशा संमेलनात आले म्हणजे आपण आणखी वाचन केले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव होते. समाजात दंगल होऊ न देणे, ही प्रत्येक कलावंताची जबाबदारी आहे. आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष महेंद्र भवरे यांनी धर्माधिष्ठीत व्यवस्था आंबेडकरी चळवळ नाकारत असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय इतिहास जमा करणारे वातावरण सध्या दिसते. विचारवंतांना संपविण्याचा घाट घातला जात आहे. समूहाचे दु:ख ही संकल्पना आज बाद झाली, असे ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या, जगण्यातले सगळे संदर्भ साहित्यात रुजविले तरच भावी पिढी भक्कमपणे उभी राहील. प्रा. माधव सरकुंडे यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता आंबेडकरी विचार हाच पर्याय असल्याचे सांगितले. साहित्य हे लोकमनाला प्रशिक्षण देते. अनेक परदेशी सेवक आम्हाला ख्रिस्ती करतात, कुणी आम्हाला वनवासी करतात. त्यामुळे आता आंबेडकरी विचार स्वीकारून आमचा विकास झाला पाहिजे. प्रा. सतेश्वर मोरे म्हणाले की, आमच्या साहित्याचे प्रयोेजन धम्मासाठी आहे. आणि धम्माचे प्रयोजन जगपरिवर्तन आहे.संमेलनाचे उद्घाटक लोकनाथ यशवंत म्हणाले, तथाकथीत भारतीय साहित्य जागतिक पातळीवर कधीच पोहोचू शकत नाही, कारण ते जातीच्या मर्यादेतच गुरफटलेले आहे. इतर कला प्रकार महागडे असले तरी कविता पैसे मागत नाही. कवितेतून मनातली भडास निघते. मन साफ होते आणि आरोग्य ठणठणीत राहते. आपल्या पोटातले मुल महान बनूनच जन्मास यावे, असे प्रत्येक आईला वाटते. कवीनेही स्वत:च्या कवितेबद्दल हिच भावना ठेवली तर दर्जेदार काव्यनिर्मिती होईल, असे यशवंत यांनी सांगितले.
विचारपीठावर स्वागताध्यक्ष निबंधक नंदकुमार रामटेके, सिद्धार्थ मोकळ उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद गायकवाड, संचालन सुनील वासनिक यांनी केले. सुनील भेले यांनी संदेश वाचन केले. कवडू नगराळे यांनी पाहुण्याचा परिचय, तर बळी खैरे यांनी भूमिका विषद केली. यावेळी योगानंद टेंभूर्णे यांच्या युगांतराच्या उजेडवाटा पुस्तकाचे प्रकाशन झाले. तत्पूर्वी घनश्याम पाटील आणि संचाने क्रांतीगीते सादर केली.