सरकारचे धोरण केवळ शेतकरी आत्महत्येचे कारण

0
16

गडचिरोली, berartimes.com दि.२७–आजतागायत होऊन गेलेल्या दोन सरकारच्या कार्यकाळात शेतकरी हिताच्या समस्यांचे आश्‍वासन दिल्या गेले. त्यामुळे शेतकर्‍यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणल्याने आता देशात व राज्यात तिसरे सरकार आले असून शेतकरीहिताचा बागुलबुवा करणार्‍या विद्यमान सरकारनेही शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. या कारणाने शेतकरी कर्जात बुडून आत्महत्या करीत आहे. उत्पादन खर्चानुसार पिकाला भाव मिळत नसल्याने व शेतकर्‍यांना आपल्याच मालाच्या किमती ठरविण्याचे अधिकार नसल्याने शेतकर्‍यांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. याला मुख्य कारण सरकारचे तुघलकी धोरण असल्याची टीका नागपूरचे राम नेवले यांनी केली.
येथील युगात्मा शरद जोशी साहित्यनगरी संस्कृती सांस्कृतिक सभागृहात आयोजित तिसर्‍या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी करण्यात आला. तिसर्‍या सत्रातील ‘शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी ‘यशोगाथांचे’गौडबंगाल’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राला श्रीकांत उमरीकर, अरविंद देशमुख, अरुण केदार आदी उपस्थित होते. देशात आतापर्यंत ३ लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून महाराष्ट्रात हा आकडा ४५ हजारावर पोहोचला आहे. यात सर्वाधिक विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे. शेतकरी दोन्ही हातांनी कष्ट करून देशातील १२५ कोटी जनतेला व कारखानदारांना धानपीक पुरवितो. एवढे करूनही शेतकर्‍यांनाच उपाशी राहावे लागते. कर्जामुळे शेतकर्‍यांना आत्महत्येला बळी पडावे लागते. याला जबाबदार सरकारच असल्याचा घणाघात राम नेवले यांनी केला. पूर्वी व्ही. पी. सिंग यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने कर्जमाफीचा निर्णय दिला होता. त्यामुळेच शरद जोशी यांनी कृषिनीती तयार केली. मात्र, यावर पंतप्रधानांनी कसल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि म्हणूनच शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागत असल्याची टीका राम नेवले यांनी केली. दुसर्‍या सत्रातील ‘ग्रामीण स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन’या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. सुमिता कोंडबत्तुलवार यांनी आई वडिलांनी आपल्या पाल्यावर योग्य संस्कार करावे. मुलींनी उच्च शिक्षणाची कास धरून स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी साहित्यिक, कवी व कृषी क्षेत्रातील जाणकार मंडळी उपस्थित होती.