मुंबई-लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर मांडणारा संघर्ष यात्रा हा चित्रपट भारतीय जनता पार्टी चित्रपट युनियनतर्फे निर्माण करण्यात येणार असून मा. गोपीनाथरावांच्या पुढील वर्षीच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तो रिलीज करण्यात येईल.
भाजपा चित्रपट युनियनचे अध्यक्ष संदीप घुगे यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी चित्रपटाचे निर्माते भाजपा प्रदेश सहकार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी, भाजपा चित्रपट युनियनचे सरचिटणीस सूर्यकांत बाजी, सरचिटणीस संजयसिंग सोमवंशी व दिग्दर्शक साकार राऊत उपस्थित होते.
संदीप घुगे म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून भाजपा चित्रपट युनियनची स्थापना झाली होती. त्यांनी चित्रपट युनियनला नेहेमीच पाठबळ दिले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा जीवनपट सादर करणारा चित्रपट निर्माण करण्यात येत आहे.
दिग्दर्शक साकार राऊत म्हणाले की, चित्रपटाचे चित्रिकरण फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू होईल व 11 डिसेंबर 2015 रोजी हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आहे. मा. गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेसाठी तसेच चित्रपटातील विविध भूमिकांसाठी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी चर्चा सुरू आहे. लवकरच या कलाकारांची नावे जाहीर करण्यात येतील.
ते म्हणाले की, गोपीनाथरावांनी 1971 साली महाविद्यालयात प्रवेश केल्यापासून त्यांचे 2014 साली निधन झाल्यापर्यंत त्यांच्या आयुष्यातील घटना या 150 मिनिटांच्या चित्रपटात मांडण्यात येतील. त्यांच्या राजकीय आयुष्यातील अनेक घटनांचे संशोधन करणे व त्याच्या आधारावर चित्रपटाची पटकथा तयार करणे हे एक आव्हान आहे. माझी टीम त्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे.
चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई, दिल्ली व बीड येथे होणार आहे. चित्रपटाचे बजेट चार ते पाच कोटी रुपये असेल, अशी माहिती त्यांनी दिली.