माजी आमदार सुखदेवबाबू उईके यांचे निधन

0
14

आरमोरी ता.३०- विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, क्रांतिवीर नारायणसिंह उईके यांचे मानसपुत्र आणि आदिवासी व शेतमजुरांचे झुंजार नेते सुखदेवबाबू उईके यांचे आज (ता.३०) दुपारी ३ वाजता ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णा‍लयात निधन झाले. मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, स्नुषा व बराच मोठा चाहता वर्ग आहे. उद्या ३१ जानेवारीला दुपारी १२ वाजता देसाईगंज (वडसा) येथील वैनगंगा नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

सुखदेवबाबू उईके यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मांगली या गावी झाला. चिमूर हे त्यांचे पैतृक गाव. त्यांचे वडील पुंडलिक उईके हे वनरक्षक होते. वडिलांची वारंवार बदली होत असल्याने त्यांनी सुखदेवबाबूंना शिक्षणासाठी चिमूर येथे ठेवले. तेथे आत्याकडे सुखदेवबाबूंनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी वरोरा येथील नेताजी हायस्स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर क्रांतिवीर नारायणसिंह उईके यांनी चंद्रपुरात सुरू केलेल्या ‘जयसेवा’ वसतिगृहात राहून सुखदेवबाबूंनी तेथील ज्युबिली हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले १९५३ मध्ये सुखदेवबाबूंनी मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी आदिवासी समाजातील एखादा मुलगा मॅट्रीक होणे हे कुतूहलच होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नारायणसिंह उईके यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिकाची नोकरी पत्करली. याच सुमारास त्यांनी चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९५२ मध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार झाल्यानंतर नारायणसिंह उईके वडसा (देसाईगंज) येथे वास्तव्यास आले. त्यावेळी सुखदेवबाबू उईके यांची बदली ब्रम्हपुरी येथे करण्यात आली. या दशकात नारायणसिंह उईके यांची कारकीर्द बहरत आली होती. मात्र १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी सुखदेवबाबूंना सोबत काम करण्यात सांगितले. त्यावेळी सुखदेवबाबूंनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन वडसा येथील आदर्श विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नारायणसिंह उईके यांचे सामाजिक चळवळीचे काम सुरूच होते. १९६७ मध्ये सुखदेवबाबूंना जमिनीच्या सत्याग्रहाच्या लढ्याच्या वेळी चंद्रपूर व अमरावती कारागृहात तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळपासून जबरानजोतधारकांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून सुखदेवबाबूंनी अभूतपूर्व लढा दिला. १९७८ मध्ये त्यांनी मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासमवेत असंघटित कामगारांसाठी मोठे काम केले. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठीही त्यांनी १९८० ते ८६ पर्यंत अनेक वेळा मोर्चे काढले. याच काळात गडचिरोली जिल्ह्यात ‘जंगल बचाव-मानव बचाव’ आंदोलन सुरू झाले. तेव्हा भोपालपट्टनम व इचमपल्ली या दोन मोठ्या धरणांचे नियोजन सुरू होते. या धरणांमुळे स्थानिक आदिवासींचे विस्थापन होणार म्हणून मोठे आंदोलन सुरू झाले. सुखदेवबाबू उईके व हिरामण वरखडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. १९८४ मध्ये त्यांनी मोहन हिराबाई हिरालाल, डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांच्या सहकार्याने ‘आम्ही आमच्या आरोग्या‍साठी’ या संस्थेची स्थापना केली. १९८५ हे वर्ष सुखदेवबाबूंच्या जीवनात परिवर्तनाचे वर्ष ठरले. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. शरद पवार राज्यात संयुक्त विरोधी पक्षनेते होते. त्यांनी सुखदेवबाबू उईके यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून तिकीट दिले आणि भरघोष मतांनी ते विजयी झाले. अभ्यासू, निर्भीड व संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार हे सुखदेवबाबूंचा आदर करीत असत. आमदार असताना त्यांनी आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते. १९९३ ते ९४ या काळात त्यांनी परिवहन महामंडळाचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तत्पूर्वी १९९० मध्ये काँग्रेस पक्षाच्या मतविभाजनामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पूर्वीप्रमाणेच लोकचळवळीत स्वत:ला झोकून दिले. रोहयो, पंचायत राज, ग्रामसभा सक्षमीकरण, जबरानजोतधारकांना जमिनीचे पट्टे, जंगल, जमीन, मामा तलावांचे नुतनीकरण इत्यादी विषयांसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते.सामान्य माणसांच्या जगण्याच्या विषयांवर त्यांनी अनेक लोकगितांचीही रचना केली आहे. अशा या लोकनेत्याची प्राणज्योत आज दुपारी मालवली.