गोंदियात आढळले ‘कॉमन क्रेन’

0
13

गोंदिया : पूर्व विदर्भवासीयांसाठी नवलाईच्या ठरणाऱ्या ‘कॉमन क्रेन’ या युरोपियन पक्ष्याने अस्तित्व गोंदिया जिल्ह्यात आढळले आहे. दुर्मिळ होत असलेल्या सारसांसोबत या कॉमन क्रेनने गोंदियात मुक्काम ठोकल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
तलावांचा आणि नद्यांचा जिल्हा असलेला गोंदिया म्हणजे देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडीचे ठिकाण. धानाच्या शेतीमुळे येथील वातावरण पक्ष्यांसाठी आदर्श असे आहे. याआधी अमरावती आणि अकोला जिल्ह्यात ‘कॉमन क्रेन’ पक्षी आढळल्या नोंद आहे. पण पूर्व विदर्भात या पक्ष्याचे अस्तित्व दिसत नव्हते. गोंदियात तब्बल ३१ पक्षी आढळल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. भारतात गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये, तसेच मध्यप्रदेशातील चंबळच्या घाटीत हा पक्षी आढळतो. मात्र महाराष्ट्रात या पक्षाची नोंद क्वचितच आढळते.
दरवर्षी थंडीच्या दिवसात जिल्ह्यात विदेशी पक्षी मुक्कामाला येतात. उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर ते पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. मात्र यावर्षी युरोपातील कॉमन क्रेन हा पक्षी पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. क्रेन (क्राँच) परिवारातील असलेला हा पक्षी सारसासारखा दिसणारा आहे. त्याची उंची चार फुटापर्यंत असते. सारसाप्रमाणेच दिसणारा असल्यामुळे तो पक्षी आकर्षक आणि रूबाबदार वाटतो.
निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनीही या पक्ष्यांची माहिती देण्यात आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांच्यासह दुष्यंत रेभे, निशांत ठाकरे, शशांक लाडेकर आदी सहकार्य करीत आहेत