दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा-राजकुमार बडोले

0
11

नागपूर दि. 4 :-  समाजाने दिव्यांगाकडे दयेच्यादृष्टीने न पाहता त्यांना त्यांचे हक्क मिळवून द्यावेत. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. चिटणीस पार्क येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर,जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिपक गेडाम, समाज कल्याण उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, समाज कल्याण अधिकारी श्रीमती सुकेशिनी तलेगोटे उपस्थित होते.
राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असून त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन
उपस्थितांची दाद मिळविली. ते पुढे म्हणाले की, समाजातील अनेक दिव्यांग बंधुंच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभागामार्फत सकाळी दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली गांधीबाग उद्यान येथून काढण्यात आली. या रॅलीस राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, गिरीष व्यास, दयाशंकर तिवारी, समाज कल्याण उपआयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड व दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. चिटणीस पार्क येथे आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नागपूर शहर व ग्रामीण भागातील विविध विद्यालयातील मुकबधीर, अस्थीव्यंग, अंध, मतीमंद विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करुन उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विनल सांगोडे यांचा राजकुमार बडोले यांनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव केला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन विनल सांगोडे यांनी तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे यांनी मानले.या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात अपंग विद्यार्थी,पालक व नागरिक उपस्थित होते.