मनरेगा योजनेचा दहावा वर्धापन दिन साजरा ; अमरावती जिल्ह्याला दोन पुरस्कार

0
16

नवी दिल्ली : मागेल त्याला हक्काचे काम देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा दहावा वर्धापन दिन थाटात साजरा झाला. यावेळी मनरेगाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अमरावती जिल्ह्याला दोन श्रेणीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राज्यातून 80 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

येथील विज्ञान भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री बिरेंद्र सिंग, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत, केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री निहाल चंद तसेच देशातील विविध राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील ग्रामविकास मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सभापती, सरपंच, मनरेगामध्ये काम करणारे मजूर उपस्थित होते. याप्रसंगी रोजगार हमी संदर्भातील विविध तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहूल चिखलदरा तालुक्यात उत्तम प्रकारे मनरेगा योजना राबविणारे तत्कालीन जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना यावेळी पुस्कार प्रदान करण्यात आले. याच जिल्ह्यातील शाखा पोस्ट मास्टर गोकुल शंकर अलोकार यांना नरेगातील लाभार्थ्यांना आर्थिक मदत पारदर्शीरित्या पोहोचविल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले.

श्री. महिवाल म्हणाले, अमरावती जिल्ह्यात सिचंन क्षेत्र कमी आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. हे थांबविण्याकरिता जिल्ह्यात त्रिस्तरीय योजना राबविण्यात आली. गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला गेला, ज्यामुळे मनरेगाच्या कामांना गती मिळाली. फलोत्पादन, जलसंधारण, वृक्षारोपण या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकातही वाढ झाली. तसेच या ठिकाणातील स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामधील अंबाकाटी-निरगुटी येथील नरेगातील मजूर रमेश मावसकर यांनी यावेळी मनरेगातून झालेल्या प्रगतीबाबत मनोगत व्यक्त केले. मनरेगामुळे किमान 100 दिवस रोजगाराची हमी मिळाली. गावामध्ये खते, जमिनीचे सपाटीकरण, बंधारे बनविण्याचे काम केले, ज्यामुळे पाणी टंचाईपासूनही मुक्तता मिळाली. मनरेगामुळे मुलं-मुली आता गावात शिकत आहेत. जीवनाला स्थैर्य मिळाले आणि जीवनमान सुधारल्याचे मत श्री. मावसकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास उपसचिव श्रीमती आर. विमला, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, राज्याचे समन्वयक जगदीश मनियार यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सभापती यासह मनरेगा अंतर्गत उत्तम कार्य करणारे राज्यातील मजूर असे एकूण 80 जणांचा चमू या सोहळ्यास उपस्थित होता.