कुट्ट पारधीला १२ पर्यंत वन कोठडी

0
16

विशेष सीबीआय न्यायालयात सादर : नागझिर्‍यातील वाघाचीही शिकार केल्याची माहिती

नागपूर : वाघांची शिकार करणे व त्यांच्या अवयवांची तस्करी करणारा कुख्यात तस्कर कुट्ट छेलाल पारधी याला मंगळवारी पहाटे कटनी (मध्य प्रदेश) येथून अटक करण्यात आली. बुधवारी त्याला नागपुरातील सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत वन कोठडी ठोठावली आहे. विदर्भातील वाघांची शिकार केल्याप्रकरणी आतापर्यंत ४0 जणांना अटक करण्यात आलेली आहे. नागझिरा येथील प्रसिद्ध राष्ट्रपती नावाच्या वाघाची शिकार सुद्धा कुट्टुनेच केली, अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली आहे.
कुट्ट पारधी हा मूळचा कटनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. तो वाघ व इतर वन्यपाण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी करतो. गेल्या दीड वर्षांपासून तो फरार होता. मुंबई येथील सीबीआयची चमू त्याच्या शोधात होती. कुख्यात कुट्ट हा कटनीमध्ये असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर सीबीआय मुंबई आणि मेळघाट सायबर क्राईम यांनी संयुक्तपणे मंगळवारी पहाटे ५.३0 वाजता कटनी येथे कुट्टच्या निवासस्थानी धाड टाकली व कुट्टला अटक केली.
त्याच्या अटकेच्या विरोधात गावकर्‍यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. पोलिसांनी हवेत गोळीबार करून गावकर्‍यांना हटविले. त्यांनतर आज सकाळी कुट्टला नागपुरात आणण्यात आले. सीबीआयच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याची १२ मार्चपर्यंत वन पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.