महिलादिनी राष्ट्रवादीचे “कृतज्ञता वर्ष’ सुरू

0
22

मुंबई – महिला दिनानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमांचा शुभारंभ होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे वर्ष “कृतज्ञता वर्ष‘ म्हणून साजरे करण्याचा संकल्प केला आहे. वर्षभर पक्षाच्या विविध विभागाच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महिलादिनी 8 मार्चला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेल्या सहा महिलांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. मुंबई महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत.

या वेळी शबाना आजमी, (सामाजिक), कविता महाजन (साहित्य), फैयाज (कला), डॉ. इंदिरा हिंदुजा, (आरोग्य), कुमुद संघवी-चावरे (पत्रकारिता), वीणा परब-गोरे (क्रिडा), अनुराधा देसाई (कृषिसंलग्न उद्योग) या महिलांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.