उपोषणकर्त्या महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव
सालेकसा,दि.२३ : आमगावखुर्द येथे कायमची दारूबंदी व्हावी, यासाठी गावकर्यांनी १६ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, कायमच्या दारूबंदीसाठी २३ मार्च रोजी विशेष सभेत मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत २९० विरूद्ध ४१ मतांच्या फरकाने दारूबंदीचा ठराव पारीत झाला. मात्र, गावात दारूविक्री सुरू असल्याने गावकर्यांना उपोषणावर बसावे लागले. शेवटी सालेकस्याला आलेल्या पालकमंत्र्यांनाच दारुबंदी समितीच्या महिला पदाधिकार्यांनी (दि.२२) उपोषण मंडपाजवळून जातांना घेराव घातला.त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत दोन दिवसात दारूबंदीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यामुळे आमगावखुर्द येथे दारूबंदीचा मार्ग सुखर होणार आहे.यापुर्वी राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी यांच्यावतीने दारुबंदी समितीच्या प्रमुख विमल कटरे यांना पत्र देऊन त्वरीत कारवाईचे आश्वासन दिले होते.मात्र त्या पत्रावर कारवाई न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

आमगावखुर्द येथील परवानाधारक तसेच विनापरवाना सुरू असलेले देशी देशी दारूचे दुकान बंद व्हावेत, याकरिता गावातील महिलांच्या पुढाकाराने दारूबंदीचे आंदोलन दोन वर्षांपासून सुरू होते. या आंदोलनाला आता पूर्णविराम लागण्याची चिन्ह दिसत आहेत. आमरण उपोषणकर्त्यांमध्ये ३ महिला तर २ पुरुषांचा समावेश असून रोज ५ महिला साखळी उपोषण करत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लढा देत आहेत. आमरण उपोषणकर्त्यांमध्ये उषा ब्राह्मणकर, कामुनाबाई देशमुख, राधिका बाई बागडे या महिलांचा समावेश असून विष्णू वशिष्ठ, मनोज शिवनकर हे पुरुष आहे. विशेष म्हणजे, २३ मार्च रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेच्या ठरावानुसार एकूण उपस्थित नागरिकांपैकी २९० विरुद्ध ४१ या फरकाच्या बहुमताने पारीत करण्यात आला. दारूबंदीच्या ठरावाला न जुमानता अद्यापही दारूची दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनातर्पेâ ग्रामसभेच्या ठरावाची वैधता तपासणीकरिता आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार सदर सभेची तपासणी केली असता चित्रफित, फोटो तसेच ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांनुसार सभा वैध असल्याचा उत्तर गटविकास अधिकारीमार्फत देण्यात आले. २२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देऊन जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिरंगाईबद्दल जाब विचारत खडेबोल सुनावले. दोन दिवसाची मुदत देत प्रकरण निकाली काढण्याचेसुद्धा बजावले. जेव्हापर्यंत आम्हाला लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच असणार असे उपोषणकर्त्यांची म्हणणे असून पुढील दोन दिवस उपोषण सुरूच राहणार अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.




