‘बीबीसीने भारतावर रेप केलाय’

0
7

लखनऊ-दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणावर बनविण्यात आलेला माहितीपट जगभर दाखवून बीबीसीने भारताची सभ्यता आणि संस्कृतीवर एकप्रकारे बलात्कारच केला आहे,’ असा संताप समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांनी व्यक्त केला आहे.

दिल्ली बलात्कार प्रकरणावर ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीनं एका कंपनीच्या मदतीनं बनविलेल्या माहितीपटावरून देशात सध्या मोठे वादळ उठले आहे. अटी-शर्थींचं उल्लंघन करून बनविण्यात आलेल्या या माहितीपटात बलात्कारातील एका आरोपीचीही मुलाखत आहे. या नराधम आरोपीनं मुलाखतीत बलात्कार पीडित तरुणी व अन्य महिलांविषयक अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं माहितीपटाला जोरदार विरोध झाला. संसदेतही विरोधी पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरत कारवाईची मागणी केली. त्यानंतर सरकारने लगेचच माहितीपटाच्या प्रसारणावर बंदी घातली. मात्र, ती झुगारून बीबीसीनं हा माहितीपट जगभर दाखवला. त्यामुळं देशभरात बीबीसीचा निषेध होत आहे. लखनऊ येथील निषेध प्रदर्शनात सहभागी झालेल्या अपर्णा यादव यांनी याप्रकरणी तीव्र भावना व्यक्त केल्या.

‘हा माहितीपट मी पाहिलेला नाही. पण त्याबद्दल वाचले आहे. भारत सरकारच्या बंदी आदेशानंतरही बीबीसीनं याचं प्रसारण करून संसदेचा अपमान केला आहे. या माहितीपटात देशाची चुकीची प्रतिमा रंगविण्यात आली आहे. बीबीसी जे काही करत आहे, ते एखाद्या बलात्कारासारखंच आहे. बीबीसीच्या या उद्योगांमुळं भारतातील पर्यटन उद्योगावर विपरीत परिणाम होईल,’ अशी भीतीही यादव यांनी व्यक्त केली आहे.