संघ परिवाराच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेला नागपूरात सुरुवात

0
9

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून सुरुवात झाली. दर तीन वर्षांनी होणा-या व तीन दिवस नागपुरात भरणा-या या सभेला संघ परिवारातील 35 संघटनांचे सुमारे 1200 प्रतिनिधी उपस्थित आहेत. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा, राम माधव या सभेला उपस्थित आहेत. या सभेत संघ पातळीवर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यशैलीमध्ये मोठे फेरबदल होण्याची संकेत मिळत आहेत.देशातील विविध प्रदेशात आपापल्या मातृभाषेतून शिक्षण घेणे व त्याचा प्रसार करणे, आरोग्य संवर्धनासाठी योगाचा प्रसार करणे, संघाच्या सध्याच्या गणवेशात बदल करणे व संघाचे पूर्णवेळ घराबाहेर राहून प्रचारक म्हणून काम करणा-यांना विवाह करण्याची (सध्या संघ प्रचारकांना संपूर्ण ब्रह्मचर्य पाळावे लागते) परवानगी देणे, तरूण व कमी वय असलेल्या व्यक्तींना महत्त्वाच्या जबाबदा-या देणे आदी प्रमुख मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते आहे. तीन दिवस चालणाऱ्या सभेत सरकार्यवाह यांची निवड केली जाणार आहे. सध्याचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या जागी कर्नाटकमधील संघाचे तरूण नेते दत्तात्रय होसबळे यांच्या नियुक्तीवर पुढील तीन दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे.

नागपुरात आजपासून संघाची सुरू झालेली अखिल भारतीय प्रतिनिधी सभा अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्रसेविका समिती आणि भाजपसह संघ परिवारातल्या 34 संघटनांचे प्रतिनिधी या सभेत भाग घेतात. या सभेत संपूर्ण वर्षाचा लेखा-जोखा मांडला जातो. प्रतिनिधी सभेची बैठक दरवर्षी होत असली तरीही दर तिसऱ्या वर्षी नागपूरमध्येच होणा-या सभेला महत्त्व असते. केंद्रात प्रथमच स्वबळावर भाजप सत्तेत आल्यावर आणि नरेंद्र मोदींच्या रूपाने संघाचा स्वयंसेवक पंतप्रधान झाल्यानंतर होणा-या या सभेला त्यामुळे महत्व आले आहे.