क्रांतीची मशाल राणी अवंतीबाई लोधी

0
18

सन १८५७ मध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात काही क्रांतीविरांनी इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी एल्गार पुकारला. यामध्ये एक क्रांतीची मशाल होती ती म्हणजे रामगढ येथील राणी अवंतीबाई लोथी. विरांगणा अवंतीबाईने इंग्रजांशी केलेले युद्ध देशवासियांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करीत आहे.
विलक्षण बुद्धीमत्ता, अविस्मरणीय शौर्य, पराक्रम आणि कर्मठ व्यक्तिमत्वाच्या प्रतिक अवंतीबाई लोधी यांचा जन्म १६ ऑगस्ट १८३१ मध्ये मध्यप्रदेशच्या शिवनी जिल्ह्यातील मनकोहळी या गावी राव जुझांरुसिंह आणि सुमित्रा या दाम्पत्याच्या घरी झाला. बालपणापासूनच अश्‍वारोहण, तलवार चालविणे, धनुष्यबाणाने नेहमी लक्ष्य भेदने या कामात विशेष रस घेत सैनिकी शिक्षण घेण्याकडेही त्यांचा कल राहिला. १७ वर्षाच्या वयातच प्रौढ वयाचे रामगड येथील राजा विक्रमजितसिंह यांच्याशी त्यांचा विवाह करण्यात आला. या काळात इंग्रजांनी देशातील अनेक प्रांतावर आपली सत्ता स्थापित केली होती. पुढचे लक्ष्य त्यांनी रामगडला बनविले होते. यासाठी त्यांनी आपला डाव खेळीत राजा विक्रमजितसिंह याला वेडा घोषित केले आणि रामगड येथे कोर्ट ऑफ रेजीमेंट कायम करुन इंग्रजी कंपनीची एक रेजीमेंट ठेवू लागले. परंतु अवंतीबाईने सत्तेची सुत्रे आपल्या हाती घेत रामगडचे शासन यशस्वीरित्या चालवू लागल्या. त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. १८५७ मध्ये मे महिन्यात राजा विक्रमजितसिंह यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांनी इंग्रजांना रामगडच नाही तर संपूर्ण देशातून हद्द पार करण्याचा संकल्प केला व त्या दिशेने पाऊल टाकने सुरु केले. राणीने मध्य भारतातील विविध प्रांताचे राजे, सरंजाम, जहागिरदार, रियासतदार यांच्याकडे आपले दूत पाठविले व इंग्रजांविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले.
इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी नव्या दमाने मैदानात या नाहीतर बांगड्या घालून घरी बसून रहा, असे संदेश त्यांनी पाठविले. ते वाचून अनेकांचे रक्त खळवळले. शंकरशाह आणि रघुनाथसिंह या संगीतकारांनी आपल्या संगीताच्या व कवी संमेलनाच्या माध्यमातून राणीचे संदेश गावागावात पोहचविण्याचे काम सुरू केले, परंतु इंग्रजांच्या गुप्तचरांना याची खबर मिळताच त्या दोघांना गोळ्या घालून यमसदनी पाठविले. यामुळे राणी क्रोधीत झाल्या, त्यांनी मंडला येथील डेप्युटी कमिश्नर वाडिंगटन यांच्या मुख्यालयावर हल्ला चढविला. वाडिंगटनला मृत्यूच्या घशात जाताना पाहून त्यांनी हिंदुस्तानी सैनिकांकडे जीवनदान मागीतले. त्यावर राणीने त्यांना अभयदान दिले. परंतु हेच अभयदान राणीला महागात पडले. काही दिवसातच वाडिंगटन यांनी मोठय़ा प्रमाणावर इंग्रजी सैनिकांसह रामगडवर हल्ला केला. शेवटी इंग्रजी सेना आणि राणी अवंतीबाई यांच्यात युद्धाची सुरवात झाली. पण राणी त्यांच्या हाती येत नव्हती. शेवटी अवंतीबाईच्या मंत्र्यांनी गद्दारी करीत इंग्रजांना गुप्त माहिती दिली व राणीला इंग्रजांनी चारही बाजूने घेरुन टाकले. शेवटी मृत्यू समोर बघून त्यांनी आपले सेनापती उमरावसिंह यांची तलवार मागून स्वत:च्या हाताने इहलोकाची यात्रा संपविली.
शेवटी वाडिंगटननेही राणीच्या विरगतीला सलाम केला. तो दिवस होता २0 मार्च १८५७. राणी अवंतीबाई अखेरचा श्‍वास घेत इंग्रजांना म्हणाल्या, या क्रांतीची मी एकटी जवाबदार असून राज्याच्या जनतेला व सैनिकांना व इतर जागिरदारांना दंड देवू नये, असे म्हणत त्या चिरनिद्रेत गेल्या. अशा विरांगणेचे कार्य सतत प्रेरणा देत राहणार. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीविरांनी इंग्रजांशी झुंज देत अनेक क्रांतिविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यापैकीच एक राणी अवतंबाई लोधी यांचे बलिदान समाज विसरू शकत नाही. २0 मार्च हा त्यांचा बलिदानदिन. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.