खेमेंद्र कटरे/गोंदिया-पुर्व विदर्भातील जमीनदार,महाजन व मालगुजारांनी तयार केलेल्या वाड्या व हवेली म्हणजे ग्रामीण भागातील संस्कृतीतील बारा बलुतेदारांच्या कलाकृतीचे दर्शन घडविणारा कणा म्हणावा लागेल.आजही ग्रामीण भागातील अनेक वाडेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या घराची बांधणी बघितले तर त्या बांधणीची पध्दत आणि लाकडावरील कोरीव काम हे आजच्या डिजिटल युगातही लाजवेल असेच आहे. त्यावाड्यामध्ये तिरखेडीचा चार मजली वाडा,डोंगरगाव सावलीचा नक्षीकामाकरीता प्रसिध्द असलेला डोयेवाडा आणि हिरडामाली येथील नागपूरे कुटुबियांचा वाडा जो वस्तुसगं्रहालयामध्ये रुपातंरीत होण्यासाठी आतुरतेने वाट बघतोय असे अनेक वाडे आजही आपले अस्तित्व कायम ठेवून आहेत.फक्त राज्याच्या पुरातत्व व साँस्कृतिक विभागासह पर्यटन विभागाने याकडे सकारात्मक भूमिकेने बघण्याची गरज आहे.अशाच काही वाड्यामध्ये…………….
तिरखेडीतील कटरेंचा चार मजली वाडा
आजच्या सालेकसा तालुक्यातील तिरखेडी येथे सन १८१५ च्या सुमारास जमीनदार असलेल्या कटरे कुटुंबीयांनी इंग्रज काळात तयार केलेली ही ४ मजली मातीबांधकामाची उत्कृष्ट नमुना असलेली जुनी इमारत आजही डौलाने उभी आहे. ही इमारत हरित इमारत म्हणून कोणी म्हणू शकते.पूर्व विदर्भातील गावखेड्यात या वाड्यांना हवेली असे संबोधले जाते. जे इतर इमारतींनी वेढलेले आहेत. आणि संपूर्ण परिसरास इअऊअ (वाडा) असे संबोधले गेले. पूर्वी या इमारतीपर्यंत जाण्यासाठी तीन मुख्य दरवाजे होते. त्या दरवाजावरून जामिंदारचा हत्ती आत जायचा म्हणून एका दाराला हाथी दरवाजा असे म्हणतात. परिसराचे एकूण क्षेत्र सुमारे ७ एकर होते. मागील २० वर्षाच्या कालखंडात काही इमारती आसपासच्या इमारती पाडल्या गेल्या आहेत.असा हा वाडा कटरे कुटुंबातील आहे, एक पोवार (प्रमारा) जमीनदार जे राजवंश पडल्यामुळे औरंगजेबाच्या काळात धारानगरी मालवाहून आले होते. त्या काळात ते आपल्या कुटुंबीयांसह पूर्णपणे मध्यवर्ती भारतात आले आणि आजचे नागपूर जिल्ह्यातील नगरधन (जुने नाव नंदीवर्धन) किल्ल्यावर पोहोचले आणि त्या किल्ल्यावरच २००० योद्धा घोडेस्वारांसह स्थायी जमले. या पोवार किंवा प्रमारा सैन्याने १७५० मध्ये कटक मोहिमेसाठी मराठ्यांचे समर्थन केले. कटकच्या विजयानंतर त्यांना पूर्व महाराष्ट्र मिळाला. नगरधन येथून ते पूर्वेकडील महाराष्ट्रात पसरले आणि तेथेच स्थायिक झाले. नोंदीनुसार १८१५ मध्ये ही इंग्रजांकडून जमीनदारी मंजूर झाली.आणि जमींदारीच्या जागेतील बाडा किंवा वाड्यात असलेल्या कचेहरीतून परिसरातील भागावर राज्य केले जात असे. कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याखाली लाल रंगाची फौज होती. १९४७ पर्यंत ही जमीनदारी राखली गेली.विशेष म्हणजे या तिरखेडीतील हवेली(वाड्या)मध्ये असलेल्या तलघरामध्ये त्यावेळी जी गावे जमीनदाराच्या कार्यक्षेत्रात यायची त्या गावातील लोकांकडून गोळा झालेला कर ठेवण्याच्या कामात आणले जायचे.त्यानंतर तेथील काही हिस्सा इंग्रजांना दिला जायचा.याच हवेलीच्या समोरच्या भागात कचहरी तयार करण्यात आलेली आहे.ज्यामध्ये तक्रारींचा निपटारा तिथे केले जात असे.हा वाडा सर्वांत उंच जागेवर तयार करण्यात आला असून सर्वांत वरच्या माळ्यावरुन आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवली जायची.ही कलाकृती त्या काळात तयार करण्यात आली आज जिचे जतन सांस्कृतिक धरोहर म्हणून राजवाड्याच्या धर्तीवर करणे महत्त्वाचे आहे,असे झाल्यास ग्रामीण भागातील एक नवा पर्यटन व्यवसाय वाड्याच्या भ्रमतंीवरुन तयार होऊ शकतो.
हिरडामालीच्या नागपुरे कुटुंबीयांचा वाडा आजही वस्तुसंग्रहालयाच्या प्रतीक्षेत

स्वातंत्र्यपूर्व काळात तयार झालेला गोरेगाव तालुक्यातील वाडा म्हणजे हिरडामाली येथील जमीनदार नागपुरे कुटुंबीयांचा वाडा होय.१९४५-४७च्या कालखंडात जमीनदार कुवंरलालसिहं नागपुरे यांनी मातीचे बांधकाम असलेले २ मजला वाडा तयार केला.हा परिसर ५ ते ६ एकराचा असून भव्य पंटागण,शस्त्रागार ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे.या वाड्याचे पुनर्निमाण हेमराजqसह नागपुरे यांनी केले.त्यानंतर गोरेगावचे माजी आमदार गिरिजाशंकरqसह हेमराजqसह नागपुरे यांनी कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राची जबाबदारी स्वीकारत याच भव्य अशा वाड्याच्या परिसरात राजे रायबहादूर इंद्रराजqसह नागपूरेच्या स्मरर्णाथ वस्तू संग्रहालयाचे काम केले ते १९८४ मध्ये.विशेष म्हणजे वस्तू संग्रहालय तयार करण्यासंबंधीचे मानस त्यांनी शासनाकडे व्यक्त करीत नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयाचे क्युरेटर चौधरी यांनी वस्तुसंग्रहालयाचा प्रस्ताव आराखडा तयार करून सरकारला सोपवले.परंतु आज २०२० आले तरीही शासनाने त्या वस्तुसंग्रहालयाबाबद कुठलीच भूमिका न घेतल्याने त्याला शासनाचे आश्रय न मिळाल्याने एक एैतिहासिक वस्तूंचे संग्रहालय निर्माण होऊ शकले नाही.त्यामुळे सध्याच्या घडीला नागपुरे कुटुंबीयच त्या वाड्यात असलेल्या विविध शस्त्र व पुरातन वस्तूंचे जतन संग्रहालयाच्या माध्यमातून करीत आहेत.विशेष म्हणजे दिवाळीपर्वाच्या काळात नागपुरे यांच्या वाड्यातील हे संग्रहालय जनतेसाठी खुले करून मनोरंजनासाठी मंडईचे आयोजन आजही नागपुरे कुटुqबय या वाड्याच्या परिसरात करतात.
डोंगरगावचा डोये वाडा म्हणजे अप्रतिम नक्षीकामाचा नमुुना

गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर पुर्व विदर्भातील कुठल्याच वाड्यामध्ये नसेल असे लाकडी नक्षीकाम डोये वाड्यात बघावयास मिळते.दाजीभाऊ डोये यांनी आपल्या ह्यातीत १९०१मध्ये या वाड्याच्या बांधकामाला सुरुवात केली आणि १९१३ मध्ये या वाड्याचे बांधकाम पार पडले.तब्बल १२ वर्ष चाललेले हे बांधकाम आणि त्यावेळच्या ४-५ एकर परिसरात असलेला हा वाडा भव्यदिव्य होता.आज मात्र त्या वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याने एक अप्रतिम नक्षीकाम असलेल्या तीन मजली वाडा मात्र पोरका झाला आहे.गेल्यादोनवर्षापुर्वी आलेल्या जोरदार चक्रीवादळाने या वाड्याचे छत हिरावून घेतले.सध्याच्या परिस्थितीत ४-५ हजार फुटामध्येच हा वाडा उरला असून एॅड.रामचंद्र डोये यांच्या ताब्यात आहे.बारा बलुतेदारांच्या कलेचा उत्तम नमुना म्हणून या वाड्याकडे बघितले जाते.आजही त्या वाड्यातील लाकडी फाट्यांसह दरवाजे,आलमार्यांकडे बघितल्यास बारीक कोरीव कलाकृती सध्याच्या घडीला कुठेच बघावयास मिळत नाही.




