28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home महाराष्ट्र नक्षल्यांनी जाळले गट्टा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय

नक्षल्यांनी जाळले गट्टा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय

0
27

गडचिरोली, दि.२० : सशस्त्र नक्षल्यांनी मंगळवारी(ता.१८) मध्यरात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाला आग लावून तेथील महत्वाचे दस्तऐवज व फर्निचर जाळून टाकले. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
मंगळवारी रात्री शंभर ते दीडशे सशस्त्र नक्षली गट्टा येथे गेले. त्यांनी वसाहतीत असलेल्या दोन वनरक्षकांना झोपेतून उठवून वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाकडे नेले. हे कार्यालय उघडायला लावून तेथील सर्व महत्वाचे दस्तऐवज बाहेर काढले आणि ते जाळून टाकले. या आगीत काही फर्निचरही जळाले. यामुळे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, दस्तऐवज जाळल्यानंतर नक्षल्यांनी आपला मोर्चा वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र मून यांच्या घराकडे वळविला. परंतु ते उपस्थित नसल्याने अनर्थ टळला. मात्र नक्षल्यांनी श्री.मून यांच्या निवासस्थानातील लाकडी पलंगाची तोडफोड केली, अशी माहिती आहे. गेल्या चार महिन्यात नक्षल्यांनी तीन ठिकाणच्या वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांना आगी लावल्या आहेत. यापूर्वी देचलीपठा, नंतर मालेवाडा व आता गट्टा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाला नक्षल्यांनी लक्ष्य केले.