मराठा, ब्राह्मणांनाही आरक्षण द्यावे-खासदार रामदास आठवले

0
14

पुणे,दि. २५:- “मराठा, ब्राह्मण आणि उच्चवर्णीय समाजातील नागरिकांना 25 ते 30 टक्के आरक्षण दिले पाहिजे. मात्र ते दलित, आदिवासी, ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या आरक्षणाला धक्का न लावता उरलेल्या 50 टक्‍क्‍यांमध्ये द्यावे,‘‘ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार ऑक्‍टोबरला भेटून ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेवेळी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, पश्‍चिम महाराष्ट्र युवकचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, पक्षाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.

आठवले म्हणाले, “”दलित, आदिवासी आणि ओबीसी प्रवर्गाला आरक्षण दिल्याने त्यांचा विकास होत आहे. त्यामुळे मराठा, ब्राह्मण आणि उच्चवर्णीय समाजातील नागरिक ज्यांचे उत्पन्न सहा लाखांपेक्षा अधिक नाही, अशांना आरक्षणाची सुविधा दिली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने घटनेत तरतूद करावी. त्यामुळे न्यायालयाचा अडथळा निर्माण होणार नाही.‘‘ गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी पटेल आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

आठवले म्हणाले, “”इंदू मिलच्या जागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासोबत त्यांचा अरबी समुद्रात 125 फुटी पुतळा उभारावा. दादर येथील चैत्यभूमी, इंदू मिलमधील स्मारक आणि समुद्रातील पुतळा यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगापुढे आदर्श निर्माण होईल. 24 सप्टेंबर 1932 मध्ये झालेल्या “पुणे करारा‘ची आठवण देण्यासाठी येरवडा कारागृहाला भेट दिली असून, तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी 15 लाखांचा निधी देऊ.‘‘