स्वच्छता हेच महासत्तेचे प्रवेशद्वार – मुख्यमंत्री

0
13

मुंबई ,दि.३ : देशातील बरेच लोक अजूनही उघड्यावर शौचास जातात. हे चित्र बदलणे गरजेचे असून जोपर्यत भारत स्वच्छ होत नाही, तोपर्यत आपण महासत्ता होवू शकणार नाही. देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी स्वच्छता आवश्यक असून यासाठी कार्यशाळा, प्रबोधन व लोकसहभागातून स्वच्छतेचा जागर राज्यातील सर्व गावे आणि शहरांमध्ये होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहरे हागणदारी मुक्त केल्याबद्दल शहरांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार समारंभ येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते swachh.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे प्रगत भारतात जगावर अधिराज्य निर्माण करणारे तरुण तयार होत असतांना अनेक नागरिकांना शौचासाठी उघड्यावर जावे लागते ही बाब योग्य नाही. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या ग्राम स्वच्छतेच्या मंत्राचा नागरिकांना विसर पडल्यामुळे शहरे प्रदूषित झाली असून पाण्याचे स्त्रोत खराब झाले आहेत. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर व गुणवत्तेवर होत आहे.

स्वच्छता अभियानाचा संकल्प घेऊन राज्यातील 19 नगरपरिषदांनी आपली शहरे 100 टक्के हागणदारीमुक्त केली ही अभिमानाची बाब असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वैश्विक कामामुळेच विश्वाचे कल्याण होऊन पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. यापुढे 14 व्या वित्त आयोगाचा निधी वितरित करतांना स्वच्छता हे पहिले मानक असेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कचरा हा ‘वेस्‍ट’ नाही तर ‘वेल्थ’ आहे. यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे हे ओळखून अभियानात लोकसहभाग वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दापोली, वेंगुर्ले, पन्हाळा, मलकापूर (कोल्हापूर), महाबळेश्वर, भगूर, मलकापूर (सातारा), वाई, पाचगणी, रोहा, खेड, चिपळूण, गुहागर, माथेरान, मोवाड, महाड, करमाळा, कुर्डूवाडी या नगरपालिकांसह बृन्हमुंबई महानगरपालिकेतील बी व सी वार्ड हागणदारी मुक्त घोषित झाल्याबद्दल महापौर स्नेहल अंबेकर व आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि त्या त्या नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांचा तर पंढरपूर येथील आषाढी यात्रेत चांगली स्वच्छता ठेवल्याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा तर स्वछता अभियानात सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिका हागणदारीमुक्त झाल्याबद्दल साताऱ्याचे जिल्हाधिकारी ए. मुद्गल यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संगीता आव्हाडे, चैताली राठोड व सुवर्णा लोखंडे महाराष्ट्राच्या स्वच्छतादूत

वाशिम जिल्ह्यातील संगीता नारायण आव्हाडे यांनी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधल्याबद्दल, यवतमाळ जिल्ह्यातील चैताली राठोड यांनी लग्नात दागदागिण्यांना फाटा देवून वडिलांकडून प्री फॅब्रिकेटेड शौचालय घेतल्याबद्दल तर सिन्नर, जि. नाशिक येथील सुवर्णा लोखंडे यांनी महिला बचत गटाकडून कर्ज घेऊन शौचालय बांधल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्‍ते सत्कार करुन त्यांना महाराष्ट्राच्या स्वच्छतादूत म्हणून घोषित केले.

महापौर श्रीमती अंबेकर म्हणाल्या की, मुंबई महापालिकेस 1224 सार्वजनिक शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत महापालिकेने 1334 शौचालये बांधली असून मार्च 2016 पर्यत 2000 शौचालये बांधण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत दररोज 3 हजार मे. टन कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य सचिव म्हणाले की, या मोहिमेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालयातही स्वच्छता राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असून ओला व सुका कचऱ्याची विभागणी करण्याची सवय नागरिकांना लावावी, तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, गेल्या वर्षभरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविताना स्वच्छतेची सप्तपदी ठरविण्यात आली असून राज्यातील 19 शहरांनी व मुंबई महापालिकेच्या दोन वॉर्डनी हागणदारीमुक्त स्वयंघोषित केले आहे. हे हागणदारी मुक्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. हे अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी 7 टप्पे केले असून 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत दर तिमाहीच्या अंतराने राज्यातील 265 शहरे हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही संकल्प पूर्तीच स्वच्छ महाराष्ट्राचा भक्कम पाया असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सीईपीटी युनिव्हर्सिटी, अहमदाबाद आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थांशी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समीर उन्हाळे यांनी मानले.