सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत  – राजकुमार बडोले

0
21

मुंबई, दि. 25 – राज्यातील अनेक जिल्ह्यांत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे अडत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी  येथे दिले.

सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदांची आढावा बैठक मंत्रालयातील मंत्रीमहोदयांच्या दालनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण आयुक्त पियुष सिंह, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव उ.शि. लोणारे, उपायुक्त (प्रशासन) श्री. महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बडोले म्हणाले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांत वर्ग-1 ची सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच वर्ग-2 ची समाजकल्याण अधिकारी, गृहप्रमुख, निरीक्षक ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यातील सहाय्यक आयुक्त व समाजकल्याण अधिकारी यांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे लोकांची कामे खोळंबून राहतात.

सामाजिक न्याय विभागामार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. रिक्त पदांमुळे या योजना राबविण्यात अडचणी येतात. रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांवर दिल्यामुळे त्यांची कामेही संथगतीने चालतात. विभागातील सरळसेवेतील पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करावी तसेच पदोन्नतीची पदे भरण्यासाठी पदोन्नतीच्या अटी शिथिल करता येतील का याचा विचार करून ती भरण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वच योजनांचा आढावा घ्या

श्री. बडोले म्हणाले की, सामाजिक न्याय विभागामार्फत अनेक चांगल्या योजना राबविल्या जातात. समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी या योजना उपयुक्त आहेत. परंतु योग्य अंमलबजावणीअभावी या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचाही आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांनी यावेळी दिले.