पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनात गोंदियाचे दालन ठरले लक्षवेधक

0
26

 

गोंदिया, २५: विदर्भ तसा नैसर्गिकदृष्टया संपन्न असलेला भाग. या भागातील वनसंपदा, ऐतिहासिक, प्राचीन, सांस्कृतिक, वन्यजीव पर्यटन, गड, किल्ले व मंदिरे आजही पर्यटकांना भेटीची ओढ लावत आहे. नागपूर विभागात येणाऱ्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा आणि नागपूर या पूर्व विदर्भातील जिल्हयातील अभयारण्ये, वन्यजीव, प्राचीन मंदिरे, संस्कृती, हस्तशिल्पकला, टसर रेशिम वस्त्रे यांची ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त पर्यटक पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळांकडे आकृष्ट व्हावा यासाठी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात २१ व २३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित कालीदास महोत्सवाच्या आयोजनासोबतच पूर्व विदर्भातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती असलेल्या आकर्षक अशा पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात गोंदिया जिल्हयातील दालने भेटी देणाऱ्या पर्यटकांसाठी लक्ष वेधक ठरले.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नवेगाव-नागझिरा, पर्यटक सारस, झिलमिली, शिल्पग्राम हे चार दालने लावण्यात आली होती. अतिशय आकर्षक पध्दतीने ही दालने तयार करण्यात आली होती.
नवेगांव-नागझिरा दालनामध्ये युवा काष्टशिल्पकार महेंद्र निकोडे यांनी तयार केलेले कासव, वाघ, हरीण, मत्स्य गरुड, गौतम बुध्दाची मुर्ती, वन विभागाच्या गोंदिया बांबू क्राफ्टने तयार केलेली परडी, फुलदाणी, टेबल लॅम्प, पेन स्टॅन्ड, तसेच बांबूपासून तयार केलेली फाईल, सुटकेस, घडयाळ, नवेगाव-नागझिरा ब्रॅन्डचे टि शर्टस, टोप्या विक्रीस उपलब्ध होत्या. बिबट, अस्वल, वाघ, निलगाय, सांबर, हरीण ही वन्यप्राणी तर घुबड, मोर, मत्स्य, गरुड या पक्षांची छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचा नकाशा या दालनामध्ये लावण्यात आला होता. या दालनाला भेट देवून पर्यटक गोंदिया जिल्हयातील पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेत होते.
पर्यटक सारस या दालनामध्ये छायाचित्रकारांनी काढलेले नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील निलगाय, रानगव्यांचा कळप, झाडावर बसलेला मत्स्य गरुड, मोर, ग्रेटर रॉकेट पक्षी, वाघ, सारस,अस्वल, बिबट, साप यांचे सुंदर छायाचित्र भेटी देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. जंगलात आग लागली तर आग विझविणारे यंत्र ही प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील वनसंपदा, वन्यप्राणी व पक्षी यांची माहिती देणारा माहितीपट दालनामध्ये भेट देणाऱ्या व्यक्तीना पहायला मिळत होते. त्यामुळे अनेकांची पाऊले आता या व्याघ्र क्षेत्राकडे भेटीसाठी निश्चित वळतील यांची खात्री झाली आहे.
झिलमिली या दालनामध्ये महाकवी भवभूती यांची जन्मभूमी असलेल्या जिल्हयातील आमगांव तालुक्यातील पद्मपूरची माहिती, गोंदिया जवळील बिरसी येथील राष्ट्रीय उड्डाण अकादमीविषयी माहिती, वनविकास महामंडळाकडून नागझिरा येथील लॉग हट, मधूकुंज, लताकुंज, उमरझरी, पर्यटक निवासी तंबू, नवेगावबांध येथील डिलक्स वातानुकूलीत विश्रामगृह, हॉलीडे होम्स येथील पर्यटकांच्या निवासाच्या सुविधांबाबतची सचित्र माहिती, देवरी या नक्षलग्रस्त भागातील चांदलमेटा येथील माविमच्या बचतगटाने लाख निर्मितीसाठी केलेली सेमिलता झाडांची लागवड, गोंदिया पाटबंधारे विभागाने चुलबंद, नवेगावबांध येथील संजय कुटी, मालडोंगरी बेट, बोदलकसा प्रकल्प, इटियाडोह प्रकल्प, परसवाडा तलावाचे सचित्र माहिती असलेल्या फ्लेक्सवरुन पर्यटक माहिती जाणून घेतांना दिसत होते.
शिल्पग्राम या दालनामध्ये आदिवासी कला संस्था सालेकसा येथील शिल्पग्राममधील कारागिरांनी दैनदिन वापरात येणाऱ्या हातांनी तयार केलेल्या विविध रंगाच्या कागदी पिशव्या, पेपर क्राफ्ट, फ्लॉवर पॉट, ग्रिटिंग्ज, इनव्हेलप, फोटो फ्रेम आदि साहित्य पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पर्यटकांनी या दालनापूढे एकच गर्दी केली होती. वेल कम टू गोंदियाचे फ्लेक्स हे पर्यटकांना गोंदियाला पर्यटनासाठी येण्याची साद घालत होते. जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया, वन्यजीव विभाग गोंदिया, वनविकास महामंडळ गोंदिया, वनविभाग गोंदिया यांनी काढलेल्या पर्यटनविषयक घडीपूस्तिका व पॉकेटबूक दालनाला भेट देणाऱ्या पर्यटकासाठी उपयुक्त ठरल्या.
दालनाजवळ ठेवण्यात आलेला कापडी वाघ पर्यटकांचे लक्ष वेधत होता. मुख्यमत्र्यांनी सुध्दा या वाघाशेजारी उभे राहून छायाचित्र काढले. जिल्हयातील दुर्मिळ सारस पक्षांच्या संवर्धनासाठी आयोजित सारस फेस्टीवल गोंदिया आणि नवेगांव-नागझिरा फोटोशूट कॉम्पीटिशनचे स्टॅन्डी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते. या फेस्टीवलला येण्याचे पर्यटकांना निमंत्रण देत होते. तर हौसी छायाचित्रकारांना फोटोशूट कॉम्पीटीशनचे निमंत्रणही हे स्टॅन्डी देत होते. युवा काष्टशिल्पकार महेंद्र निकोडे याने तयार केलेली गौतम बुध्दांची आकर्षक मुर्ती मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आली. जिल्हयातील विविध दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीनचे काऊन्सलेट जनरल श्री चाँग आणि श्रीमती ली, चीनच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, विभागीय आयूक्त अनूप कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, भंडारा जिल्हाधिकारी धीरज कुमार, वर्धा जिल्हाधिकारी आशूतोष सलील यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठया संख्येनी पर्यटकांनी या दालनाला भेट दिली.