अभिनेत्री खा.हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्रास 2,000 चौरस मीटर जमीन मंजूर

0
21

 

मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून मंजुरी आदेश सुपूर्द

मुंबई दि.29 : सुप्रसिध्दी चित्रपट अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्र चॅरिटी ट्रस्ट या संस्थेला सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी आंबिवली, अंधेरी (मुंबई) येथील 2,000 चौ.मी. जमीन राज्य शासनाने पर्यायी स्वरुपात मंजूर केली असून या बाबतच्या आदेशाची प्रत महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी  खासदार हेमा मालिनी यांच्याकडे रामटेक निवासस्थानी सुपूर्द केली.

खा.हेमा मालिनी यांनी शास्त्रीय संगीत, कला, नृत्य इत्यादी प्रयोजनासाठी सांस्कृतिक संकुल निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या ट्रस्टला राज्य शासनाने जमीन देण्याबाबत सन 1996 साली विनंती केली होती. हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी विनंती केली होती. सदर प्रकरण खडसे यांनी तपासून पाहिल्यानंतर जमीन देण्यासंबंधीच्या आदेश काढण्यास महसूल विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार या विभागाने 23 डिसेंबर, 2015 रोजी याबाबतचे ज्ञापन निर्गमित केले. या ज्ञापनाची प्रत खडसे यांनी आज हेमा मालिनी यांच्याकडे सुपूर्द केली.

यावेळी बोलतांना खा.हेमा मालिनी यांनी, त्यांच्या जमीन प्रकरणात एकनाथराव खडसे यांनी स्वत: लक्ष घालून जमीन वाटपाबाबतच्या प्रकरणाला विनाविलंब गती दिली व आदेशही निर्गमीत केले, याबद्दल आभार व्यक्त केले.

ही जमीन प्रदान करतांना राज्य शासनाने काही अटी घातल्या असून त्यानुसार ट्रस्टने सदर जमिनीच्या नेमून दिलेल्या भागावर वृक्षराजी असलेले उद्यान स्वखर्चाने विकसित करुन त्याची देखभालही करावयाची आहे. तसेच, हे उद्यान जनतेसाठी खुले ठेवावे लागणार आहे. याखेरीज, ट्रस्टने त्यांचे प्रस्तावित कला केंद्राचे बांधकाम जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यापासून दोन वर्षाच्या आत पूर्ण करावयाचे आहे. संस्था धर्मादाय स्वरुपाची असल्याने तिला नफा कमावता येणार नाही. संस्थेने त्यांच्या प्रकल्प खर्चापैकी पंचवीस टक्के रक्कम मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे भरावयाची असून उर्वरीत पंचाहत्तर टक्के रक्कम ट्रस्ट कशा प्रकारे उभी करणार आहे, याचा पुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे संस्थेला द्यावा लागणार आहे. या अटींची पूर्तता झाल्यानंतरच जमीन वाटपाचे अंतिम आदेश जिल्हाधिकारी काढणार आहेत.

**-**