प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना जैवविविधतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
14

जैवविविधतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
गोंदिया,२९ : नैसर्गिकदृष्टया संपन्न असलेल्या या जिल्हयात अनेक पर्यटनस्थळे आहेत. तलावांचा आणि धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयात जैवविविधता विपूल प्रमाणात आहे. सारस फेस्टीव्हलचे औचित्य साधून जिल्हयातील सारस पक्षांबाबतची व जिल्हयातील जैवविविधतेबाबतची माहिती प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना नुकतीच करुन देण्यात आली. वन्यजीव व पक्षी अभ्यासक मुकूंद धुर्वे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शनातून व स्लाईड शोद्वारे माहिती करुन दिली.
सारस हा पक्षी केवळ राज्यात गोंदिया जिल्हयात आढळून येणारा व सर्वात मोठा पक्षी असून तो केवळ जमीनीवर आपले घरटे बांधतो. हा पक्षी झाडावर बसत नाही. जोडीदाराची एकदा निवड केल्यानंतर तो आयुष्यभर सोबत राहतो. जोडीदारापैकी जर एकाचा मृत्यू झाला तर दुसरा त्याच्या विरहाने प्राण त्यागतो. हा पक्षी जिल्हयात वैनगंगा नदीचा व बाघ नदीच्या काठावर उत्तर भागात तसेच परसवाडा, झिलमिली तलावाच्या काठावर आढळून येत असल्याचे श्री. धुर्वे यांनी सांगितले. जिल्हयातील पानथळ असलेल्या भागात स्थलांतरीत पक्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दिसून येतात. त्यांची मुळ वस्ती असलेल्या भागात या काळात बर्फ पडत असल्यामुळे हे पक्षी स्थलांतर करुन जिल्हयात दाखल होतात. देवधान, किटक, मासे व पानथळ जागेवरील वनस्पती हे खाद्य स्वरुपात विपूल प्रमाणात त्यांना मिळत असल्यामुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणात दाखल होतात.
जिल्हयातील परसवाडा, झिलमिली, नवेगावबांध, शृंगारबन, सिरेगांवबांध, गोठणगांव यासह अन्य तलावांवर ग्रे लेग गूज, बार हेडेड गूज, कॉम्ब डक, कस्टर्ड पोचार्ड, ग्रीन पोचार्ड, कॉमन क्रेन, इंडियन पिट्टा, रेड क्रिस्टेड पोचार्ड, कॉमन टेल, नॉर्थन पिटेल, नॉर्थन शॉवेलकर, युरेशिएन विडोंल, स्पॉट बिल डक, फोरोजिनस पोचार्ड, यासह ३५० च्या आसपास स्थलांतरीत पक्षी आढळून येत असल्याची माहिती श्री धुर्वे यांनी विद्यार्थ्यांना दिली.