नगर पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

0
8

मुंबई : राज्यातील १७ नगर पंचायत निवडणुकींमध्ये २८९ पैकी सर्वाधिक १0४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून त्या खालोखाल ७८ जागा जिंकलेला राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या स्थानी आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचा पुरता धुव्वा उडाला. सेनेला ५७ तर भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावे लागले.
राज्यात १७ नगर पंचायती व दोन नगरपालिकांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत घवघवीत यश मिळवले. १७ पैकी नायगाव व हिमायतनगर (नांदेड), उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदूरबार जिल्ह्यातील आक्राणी, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व कोरपना या सात नगर पंचायत निवडणुकीमध्ये काँॅंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या यशाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व शेवगाव, रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि म्हसळा अशा चार नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत पटकावले. चार नगरपालिकांसह एकूण ७८ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील जामखेड नगरपालिकेत भाजपाचा दारुण पराभव झाला. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड व अहमदनगर महानगरपालिकेच्या तसेच निलंगा व हिंगणघाट नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.