विवेकचा मृतदेह बघताच आईवडिलांनी फोडला हंबरडा

0
18

 उपस्थितांच्याही अश्रूंचा बांध फुटला

 पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर विवेकचा मृतदेह काढण्यात प्रशासन यशस्वी

गोंदिया- गेल्या बुधवारी आपल्या आजीसोबत विवेक शेळया चारायला गेला तो कायमचाच. शेतात नव्यानेच खोदलेल्या खड्ड्यात तो पडला. प्रशासनाने विवेकला वाचविण्यासाठी सलग पाच दिवस प्रयत्नही केले. पण व्यर्थच. शेवटी हाती लागला तो विवेकचा मृतदेहच. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मृतदेह बाहेर पडताच घटनास्थळावरून तसूभरही न हललेल्या विवेकच्या आईवडिलांचे काळीज फाटले. त्यांनी एकच हंबरडा फोडला. आणि पंचक्रोशीतून घटनास्थळी आलेल्या हजारो उपस्थितांच्या अश्रूंचा बांधही एकदम फुटला. एकदुसèयाला सावरायला कोणाकडेही त्राण उरले नव्हते. सर्वत्र आक्रोशच आक्रोश पसरला होता.
सडक अर्जूनी तालुक्यातील राका हे दोन हजारावर लोकवस्तीचे गाव. खुशाल दोनोडे यांच्या संसारवेलीवरील साहिल, विवेक आणि विक्की हे तीन फुले. यापैकी विक्की आणि विवेक हे तीन वर्षे वयाचे जुळे. खुशाल यांचे कुटुंबीय भूमिहीन असल्याने संसाराचा गाडा मोलमजुरी करून ओढत आहेत. त्यामुळे संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांचेकडे शेळीपालनाचा व्यवसायसुद्धा आहे. गेल्या ९ मार्च रोजी याच शेळ्या चारण्यासाठी लहानगे विवेक, विक्की आणि त्याची आजी शिवारात गेली होती. गावातील रामकृष्ण चांदेवार यांनी घटनेच्या पाच दिवस अगोदर आपल्या शेतात २८३ फूट बोअरवेल खोदली होती. बोअरवेलच्या खड्ड्यावर चांदेवार यांनी केवळ गोणपाट झाकून ठेवले होते. याच खड्ड्याशेजारी विक्की आणि विवेक ही निरागस बालके खेळत होती. अचानक विवेक खेळता खेळता त्या खड्ड्यात पडला. आवाज होताच आजीने आरडाओरडा केला. क्षणात गावकरी धावून आले. प्रशासनालाही या घटनेची माहिती देण्यात आली. प्रशासनही खडबडून जागे झाले. मदतकार्यासाठी पुण्यावरून एनडीआरएफची चमू आली. या चमूने बचाव कार्याला सुरवातही केली. विवेकला ऑक्सिजनचा पुरवठाही केला गेला. बचाव कार्यात अनेक अडचणींचा सामना बचाव पथकाला करावा लागत होता. घटनास्थळावर प्रशासनातील बडे अधिकारीसुद्धा तळ ठोकून होते.
विवेकला जिवंत बाहेर काढले जाईल, या आशेने विवेकचे पालकच नव्हे तर पंचक्रोशीतून आलेल्या नागरिक घटनास्थळावरून तसूभरही हलत नव्हते. या बचाव कार्याला ऑपरेशन विवेक हे नाव देण्यात आले होते. शेवटी पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर गेल्या रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विवेकचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. आपला मुलगा जीवंत असेल, या आशेवर तेथे असणाऱ्या विवेकच्या आईवडिलांच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह बघताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. हे दृष्य बघणाऱ्या आणि तेथे उपस्थित असणाऱ्या पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध क्षणात फुटला आणि सर्वत्र एकच आक्रोश पसरला. रात्री साडेबारापर्यंत सर्व सोपस्कार आटोपून विवेकचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अखेर पहाटे चारच्या सुमारास विवेकवर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित कुटुंबाला २ लाखाची मदत जाहीर केली. जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना, तहसीलदार परळीकर, ठाणेदार राजकुमार केंद्रे हे घटनास्थळावर ठाण मांडून होते. शेतात बोअरवेल खोदणाऱ्या रामकृष्ण चांदेवार यांचे विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेवरून जिल्ह्यात होणाऱ्या बोअरवेल खोदकामांवर आता तरी जिल्हा प्रशासन नियंत्रण ठेवील, अशी आशा जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.