मुद्रांक शुल्काव्दारे रु. २० हजार कोटी महसूल अपेक्षित -ना.खडसे

0
13

भांडवली खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढीचा वेग घटला आहे,

मुंबई, दि. १८ मार्च : राज्याच्या सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पावर नजर टाकली असता असे दिसून येते की, भांडवली खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढीचा वेग मंदावला असून योजना खर्चात घट झाली आहे. कोणत्याही राज्यात योजनेतील खर्च वाढला पाहिजे. एकंदरीत हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीने, विशेषत: शेती व शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, अशा शब्दात महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधीमंडळात मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
अर्थमंत्री यांनी या अर्थसंकल्पात काही चमत्कार करणे शक्य नव्हते, असे सांगून खडसे पुढे म्हणाले की, राज्यातील शेती आणि शेतकरी यांना त्यांच्या आपतकाळात मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वाधिक म्हणजे ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत केली आहे. आपतकालीन आणखी मदत देखील केंद्र शासन करु शकते. राज्याची महसुली तूट वाढत चाललेली आहे. भांडवल खर्च होत असतांना या भांडवलातून नवीन भांडवल किंवा उत्पन्न निर्माण झालं पाहिजे. ते होऊ शकलेलं नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. नैसर्गिक आपत्ती राज्यावर आली असली तरी, महसूल खात्याला करमणूक करासारख्या अन्य कराव्दारे मिळणाऱ्या उत्पन्नावर फारसा परिणाम झालेला नाही. कृषी उत्पन्नात घट झाली असली तरी, अन्य क्षेत्रात मात्र उत्पन्न वाढले आहे. राज्याला मुद्रांक शुल्क व नोंदणीव्दारे सुमारे रु. २०,००० कोटींपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. शीघ्र गणकाचे, अर्थात रेडी रेकनरचे दर यावर्षी प्रथेप्रमाणे जानेवारीत वाढवलेले नाहीत. आता या दराची सांगड आर्थिक वर्षाशी घालण्यात आलेली असून नवे दर येत्या १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात येणार आहेत. उत्पादन शुल्काव्दारे १५,००० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. गतवर्षी हाच आकडा १३,००० कोटी रुपये एवढा होता. व्हॅल्यु ॲडेड टॅक्स अर्थात मूल्यवर्धीत करापोटी राज्याला सुमारे ६९, ००० कोटी रुपये महसुल अपेक्षित असल्याचे मंत्री एकनाथराव खडसे यांनी शेवटी सांगितले.