पंचायत राज संस्थांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र आघाडीवर- राज्यपाल

0
7
मुंबई : महाराष्ट्र हे पंचायतराज संस्थांना अधिक सक्षम करणाऱ्या राज्यांमध्ये आघाडीचे राज्य ठरले आहे. आता 73 व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना देण्यात आलेले विविध अधिकार प्रदान करुन त्यांना अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम करावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

ग्रामविकास विभागामार्फत यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्यासह राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंच, अधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभेइतकीच ग्रामसभाही महत्वाची आहे. 14 व्या वित्त आयोगातून गावांच्या विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध होणार आहे. त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ग्रामसभा शक्ति5शाली असणे गरजेचे आहे. गावांमध्ये आतापर्यंत विकासाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. पण तरीही गावांचा म्हणावा तितका विकास झालेला नाही, हे बदलण्यासाठी नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. यासाठी गावांनी पुढील 5 वर्षांचे विकास आराखडे तयार करावेत व ‘आमचं गाव, आमचा विकास’ हा कार्यक्रम हाती घेऊन सर्वांगिण आणि नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.

गावांमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, त्या माध्यमातून भूजलसाठा वाढविणे, स्वच्छता, आरोग्यरक्षण आणि डासमुक्ती करणे यासाठी रोजगार हमी योजनेमधून भरीव आर्थिक तरतूद करुन राज्यात शोषखड्ड्याची योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी याप्रसंगी दिली.

राज्यमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, पंचायतराज संस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषदांना तर जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायींना जास्तीत जास्त अधिकार बहाल करणे गरजेचे आहेत. गावांना प्राप्त होणाऱ्या निधीचा नियोजनपूर्वक वापर केल्यास गावाचा सर्वांगिण विकास होईल. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बळकटीकरण योजना’ सुरु करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामविकासाच्या चळवळीला अधिक गती दिली जाईल, असे ते म्हणाले.

2 कोटी 70 लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान

यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर व अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिले तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच ब्रम्हपूरी (जि.चंद्रपूर), कराड (जि. सातारा) या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिले दोन तर राहुरी (जि. अहमदनगर) व मालवण (जि. सिंधुदूर्ग) या पंचायत समित्यांना तिसरा पुरस्कार विभागून प्रदान करण्यात आला. महालगाव (ता. कामठी, जि. नागपूर), लोणी बु. (ता. राहाता, जि. अहमदनगर), कसबा उत्तू़र (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम तीन पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय विविध विभागीय पुरस्कार तसेच उत्कृष्ट कर्मचारी, अधिकारी यांनाही याप्रसंगी पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रांसह एकूण 2 कोटी 70 लाख रुपयांच्या रकमेचे पुरस्कार धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आले.