साहित्य संमेलनातील भोजनबेत ठरलं,वर्धेकर स्वतः करतील तीन दिवस सरबराई…

0
11

वर्धा : संमेलनास येताय, या. पण वेळेवर न पोहचल्याने व्यवस्था न झाल्यास हताश होऊ नका. वर्धेकर तुम्हास आपल्या घरी स्वतःच्या वाहनाने नेतील व तीन दिवस सरबराई करतील. आयोजकांनी ‘आमचेही पाहुणे’ हा उपक्रम पुरस्कृत केला आहे. अपेक्षित पेक्षा अधिक पाहुणे आल्यास निवास व्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे धावपळ होऊ नये म्हणून नागरिकांची मदत या उपक्रमातून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अर्ज भरून घेणे आजपासून सुरू झाले.

संमेलनातील वाङ्मयीन चर्चा किती खुमासदार, रंगतदार होईल हे पुढचे पुढे ठरेलच. मात्र, संमेलनातील तीनही दिवसांचा भोजनबेत मात्र आताच ठरला आहे. जिव्हेच्या विविध कडांचा रसास्वाद पूर्ण करणारा हा बेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दहा विविध प्रकारचे मिष्ठान्न तृप्तीची ढेकर देण्यास पुरेसे ठरणारे आहेत.

इच्छूक नागरिकांना या अर्जात त्यांच्याकडे उपलब्ध खोल्या, स्वच्छता घर, स्वतःचे वाहन, सकाळचा नाश्ता, शाकाहारी की मांसाहारी, स्वतःचा व्यवसाय, कुटुंबातील संख्या व अनुषंगिक माहिती द्यायची आहे. प्रतिनिधींच्या इच्छेनुसार त्यांची सोय अशा वर्धेकरांकडे केली जाणार आहे. मोफत नव्हे तर माफक पैसे आकारून ही सुविधा मिळणार. कोणत्याही जात, धर्मभेदाशिवाय या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे लिहून द्यायचे आहे

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी तीन फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात उत्तपम, गार्डन इडली, मैसूर वडा, बनारसी चुरामटर व दालबदाम शिरा राहणार आहे. दुपारच्या जेवणात पनीर अकबरी, वेज कोल्हापुरी, डाळफ्राय, मिस्सीपुरी, मिस्सीपराठा, स्ट्रॉबेरी रसमलाई, मावावाटी, दहीवडा व कॉर्नकटलेट आहे. रात्रीच्या जेवणात लच्छेदार रबडी, केसरकाॅईन जलेबी व सीताफळ छेनापाईज हे तीन मिष्ठान्न, तसेच अन्य पदार्थांत इंदुरी दहीवडा, मिक्स पकोडे, कढाई पनीर, मेथी मटर मलाई व हैदराबादी वांगे राहणार. शिवाय साेबतीला झुनका, बिस्कीट भाकर, कढी, दाळ मखनी, गट्टे पुलाव, वाफवलेला भात, मिनी तंदुरी, फुलका, मिस्सीपुरी व स्टिक मलाई कुल्फी आहे.

दुसऱ्या दिवशी चार फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात इंदोरी पोहा, चना मोट, तिखट चिवडा, मिनी आलुकोफ्ता व वेजी सेन्डविच आहे. या दिवशी शनिवार म्हणून उपवास असणाऱ्यांसाठी भगरपुलाव, दही, साबुदाणा वडा, फराळी चिवडा व विलायची केळी मिळणार. दुपारच्या जेवणात फ्रुट श्रीखंड, गुलाबजामून, मिश्रदालवडा, मटर कचोरी, मटर पनीर, सावजी कोफ्ता, दाळभाजी, दाळतडका, दमतवा सावजी व फुलके असा बेत आहे.

उपवासास राजगिरा पुरी, आलुशिरा, आलुसाग, फ्रेश फ्रुट, साबुदाणा खिचडी ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या जेवणात पुरणपोळी, केसर रसगुल्ला, वेजकटलेट, जोधपुरीवडा, पनीर बटर मसाला, मलाईकोफ्ता, सेवटमाटर, दालजीरा, दालतडका, व्हेज बिर्यानी, फुलका, मिनीतंदुरी, बटर पोळी असे ताट सजणार.पाच फेब्रुवारीला नाष्ट्यात ब्रेडरोल, बडवापुरी, आलुकोहळे साग, व्हेज उपमा, चटणी, दिलजानी असा आहार आहे. तर दुपारच्या जेवणात फ्रुट कस्टर्ड, खवापुरी, मिनी मटर काेफ्ता, मद्रासी पकोडा, पनीर पसंदा, काश्मिरी कोफ्ता, दाळयलो, दाळ फंटीयर, वाफवलेला भात, मसाला पुलाव व कढी असा मुख्य बेत आहे. रात्रीस केसर चमचम, ड्रायफ्रुट हलवा, पंप मटर, सावजी पनीर, मसाला वांगे, आलूमेथी मटर, दाळतडका, स्पेशल पुलाव, फुलका व दोन प्रकारचा पराठा राहणार. संमेलनाच्या पूर्वसंध्येला दोन फेब्रुवारीला येणाऱ्यांना जलेबीसह साधे जेवण मिळणार आहे.