अभ्यास मंडळ, कार्यगट, तज्ज्ञ समित्या बरखास्त

0
9

मुंबई : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य मंडळ आणि बालभारती या संस्थांमध्ये अस्तित्त्वात असलेली अभ्यास मंडळ, लेखन गट, कार्यगट आणि तज्ज्ञ समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने आज घेतला.

इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतचे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यसाहित्य, शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन व लोक सहभागासाठी निर्णय घेण्याकरता विषयनिहाय तज्ज्ञ समित्या आणि अभ्यास मंडळे असतील. ती शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नेमण्यात आलेल्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या अखत्यारित काम करतील. या मंडळांतील सदस्यांची निवड आॅनलाइन/ जाहिरात पद्धतीने अर्ज मागवून करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी, राज्यातील अभ्यासक्रमांची काठीण्यपातळी वाढविणे व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने संरचनात्मक बदल करण्यात येणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ते पूर्ण कार्यक्षम होऊन काम सुरू करेपर्यंत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने समन्वय राहावा यासाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज समिती नेमण्यात आली.