नक्षल्यांनी वनविभागाचे डेपो जाळले

0
20

गडचिरोली, ता.२३: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री घोट येथील वनविभाग व जंगल कामगार सहकारी संस्थांच्या लाकूड डेपोला आग लावली. यात सुमारे आठशे बिटातील लाकडे जळून खाक झाली असून, जंगल कामगार संस्था व वनविभागाचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रके टाकली होती. त्यात ९ मे रोजी हुर्रेकसा येथील चकमकीत ठार झालेली वरिष्ठ नक्षलवादी रंजिता हिच्या हत्येचा निषेध म्हणून ३१ मे रोजी जिल्हा बंद करण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. मात्र लाकडे का जाळली, याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. लाकूड डेपोला आग लावल्याने आता पुन्हा नक्षलवादी हिंसक व विध्वंसक कारवायांना अंजाम देतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

घोट येथे रेगडी मार्गावर लाकडू डेपो आहे. तेथे वनविभाग व जंगल कामगार संस्थांची लाकडे ठेवलेली असतात. घोट पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाऊण किलोमीटर अंतरावर असलेल्या या डेपोत मध्यरात्री सशस्त्र नक्षलवादी आले. त्यांनी डेपोतील लाकडांना आग लावली. यात भूमखंड जंगल कामगार सहकारी संस्थेचे २१४, फुलबोडी संस्थेचे २२ व कोटगूल संस्थेचे २२५ अशा एकूण ४६१ बिटातील लाकडे जळून खाक झाली. यामुळे तिन्ही संस्थांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच आलापल्लीच्या उपवनसंरक्षकांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पहाटे वनविभागाचा टँकर व गडचिरोली येथून अग्नीशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले. परंतु तोपर्यंत बरीच लाकडे जळून खाक झाली होती.