महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा : फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

0
7

विशेष प्रतिनिधी
पंढरपुर,दि.15- राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, राज्यातला शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे असे, साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पांडुरंग चरणी घातले. पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापुजेनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनिता फुंदे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी रणजीत कुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकरी सुखी झाला तर राज्य सुखी होईल. भागवत धर्म–वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करुन दिली. या परंपरेने ऊर्जा, संस्कार, व समता मानवी जीवनाला बहाल केल्या. प्रत्येक आषाढी ही निर्मल वारी व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून बा ! विठ्ठला राज्यात भरपूर पाऊस पडू दे अशी विनवणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता फुंदे यांचा व फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळातर्फे त्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संत निवृत्तीनाथांच्या जीवन कार्यावर सचिन परब व श्रीरंग गायकवाड लिखित रिंगण नावाच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.