एकाचा मृतदेह आढळला, दुसरा बेपत्ताच

0
8

देसाईगंज, दि.१५: तालुक्यातील सावंगीनजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदीत नाव उलटल्याने बुडालेल्या एका इसमाचा मृतदेह आज सकाळी कुरुड येथील नदीकाठावर आढळून आला. माधव मैंद(४५) असे मृत इसमाचे नाव आहे. या दुर्घटनेत वाहून गेलेला एक व्यक्ती अजूनही बेपत्ताच आहे.
१२ जुलैच्या सकाळी ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथून सुमारे १२ जण नावेने सावंगीकडे जाण्यास निघाले होते. मात्र नाव वैनगंगेच्या मध्यभागी येताच ती उलटल्याने १२ प्रवासी बुडाले होते. त्यातील १० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. परंतु माधव मैंद व सचिन चंडिकार हे दोघे बेपत्ताच होते. प्रशासनाने तेव्हापासून त्यांच्या शोधासाठी मोहीम चालवली होती. मात्र सकाळी माधव मैंद यांचा मृतदेह सावंगीपासून आठ किलोमीटर अंतरावरील कुरुड येथील नदीघाटावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सचिन चंडिकार यांचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.