जिल्हा रुग्णालयांची क्षमता दोन टप्प्यात वाढविणार – डॉ.दीपक सांवत

0
9

मुंबई, दि. 21 : आगामी काळात जिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण करताना जिल्हा रुग्णालयांची क्षमता दोन टप्प्यात वाढविली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढविण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य विलास तरे, क्षितीज ठाकूर, अजित पवार, योगेश सागर, हणुमंत डोळस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना डॉ.सावंत यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात वसई, विरार, पालघर येथील लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेता येथील जिल्हा रुग्णालयातील क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याठिकाणी 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली असून याबाबत कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या 7 एकर जागेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करुन सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येईल.