वंचित लाभार्थ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देणार – सदाशिव खोत

0
7

मुंबई, दि. 22 : किनवट आणि माहूर तालुक्यातील जे शेतकरी सोयाबीन पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्याचा आढावा घेण्यात येत आहे. पीक वीमा योजनेसाठी वंचित लाभार्थ्यांची नावे नवीन यादीमध्ये सामाविष्ट करण्यात येणार असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पीक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याबाबतचा प्रश्न विधानसभेत विधानसभा सदस्य प्रदीप नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. श्री खोत यावेळी म्हणाले की, राष्ट्रीय कृषि विमा योजनेअंतर्गत निश्चित करण्यात येणारी नुकसान भरपाई केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या पद्धतीने पीक कापणी प्रयोगांद्वारे प्राप्त सरासरी उत्पन्नाच्या आधारेच निश्चित केली जाते. माहूर तालुक्यातील 2677 शेतक-यांना 2.29 कोटी नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत मंजूर करण्यात आली आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करण्याबाबतच्या सूचना बँकांना द्याव्यात असे सर्व जिल्हाधिका-यांना कळविण्यात आले असल्याची माहितीही श्री. खोत यांनी यावेळी दिली.