आदिवासी आश्रमशाळेतील मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक -विष्णु सवरा

0
6

मुंबई, दि. 27 : आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे, असे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयातील मंत्री महोदयांच्या दालनात आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव श्री. शिंदे, आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस बी. टी. भामरे, जी. एस. हमरे, किसन गुजर आदींसह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. सवरा म्हणाले की, आदिवासी विकास विभागात विविध स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्देवाने विविध कारणाने अपघाती मृत्यू होतात. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात तात्काळ कारवाई, रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणे आणि विभागातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत रिक्त पदे त्वरीत भरणे, स्त्री अधिक्षकांची रिक्त पदे भरणे,आश्रमशाळा परिसरात सर्व कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणे, एसएससी पास चतुर्थ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, गणवेश शिलाई, धुलाई भत्ता वाढविणे,गॅस शेगड्या नवीन देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत ‘काम नाही वेतन नाही’ चा आदेश रद्द करणे, मुख्याध्यापक पदी पदोन्नतीतील पद रिक्त
गणने, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पदोन्नतीची संधी देणे, क्रीडा व कला शिक्षकांची भरती करणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.