महाराष्ट्राचे तुकडे कराल तर याद राखा

0
8

मुंबई : भारतीय जनता पार्टी स्वतंत्र विदर्भाचा छुपा अजेंडा राबवत असून याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना ई मेल पाठविले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चालविल्या जाणा-या या मोहिमेमुळे सर्वोच्च न्यायालयातील बेळगाव लढ्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप गुरूवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान परिषदेत केला. सभापतींनी याबाबतची स्थगन प्रस्तावाची सूचना नाकारल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

अखंड महाराष्ट्राबाबत काँग्रेस सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. सभागृहातील सर्व कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करणे का गरजेचे आहे हे सांगताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नारायण राणे, शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी भाषणे केली.

१०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे कराल तर याद राखा, असा दमही विरोधकांनी सत्ताधारी पक्षास भरला. तुम्ही महाराष्ट्राचे आहात, एकट्या विदर्भाचे मंत्री नाहीत, विदर्भाचा जरूर विकास करा, पण महाराष्ट्र तोडायची भाषा करू नका. पद आणि अस्मिता यांची तुलना अखंड राज्याशी कदापि होवू शकत नाही. राज्य तोडायची गोष्ट मनातून काढा आणि जनतेने बहाल केलेली सत्ता व पदाला प्रामाणिक राहा, असे राणे यांनी सुनावले.

विरोधी पक्षनेते मुंडे यांनी काँग्रेसच्या अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाच्या सूचनेला पाठिंबा दिला. तुम्हाला वेगळा विदर्भ करायचा आहे, तर मग त्यावर सभागृहात स्वतंत्र चर्चा ठेवा, अशी मागणी मुंडे यांनी केली. बेळगाव, निपाणी हा सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी तडपतो आहे. याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. फडणवीस सरकार महाराष्ट्राची बाजू न्यायालयात मांडत आहे.

अशा काळात भाजपा कार्यकर्त्यांकडून लाखो ई- मेल केंद्र सरकारला वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जात असतील तर ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले.