“समाजभूषण” पुरस्कारप्राप्त मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

0
13

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे, दि. 18 : समाजातील विषमतेची विषवल्ली दूर करण्याचे काम
करणाऱ्यांना शासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या सर्व समाजभूषण पुरस्कारप्राप्त
मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाच्यावतीने येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात राज्यातील 54
व्यक्तींना व 10 संस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तेंव्हा मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा
राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, महापौर
प्रशांत जगताप, राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष
भिकू इदाते, खासदार संजय काकडे, खासदार अमर साबळे, आमदार सर्वश्री ॲड.
जयदेव गायकवाड, शरद रणपिसे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तपकीर,
आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षणाची मुहुर्तमेढ
रोवली, शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या संकल्पनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी संविधानात्मक चौकट दिली असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच देशाची प्रगती सुरु
असून आजही देश एकसंध राहीला आहे. डॉ. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने देशभक्त
होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील वंचितांचा विचार केला. प्रत्येक
वंचिताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी संविधानाच्या
माध्यमातून केले. लोकशाहीमुळे प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य
मिळाले आहे, असेही ते म्हणाले.
समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करणाऱ्यांना शासनाने
समाजभूषण पुरस्कार दिला आहे. राज्यात सामाजिक परिवर्तनाचे काम करणाऱ्या
प्रत्येकाच्यामागे शासन ठामपणे उभे राहणार आहे. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे
सर्व समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा राज्याच्या महात्मा फुले जन
आरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार आहे. या माध्यमातून या मान्यवरांना
1200 व्याधींसाठी राज्यातील 500 प्रतिथयश रुग्णालयात कॅशलेस उपचार
मिळतील. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने
महाराष्ट्राचे परिवर्तन होत आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले म्हणाले, विविध योजनांच्या
माध्यमातून शासन दलित समाजाचा विकास करत आहे. डॉ. बाबासाहेबांनी घालून
दिलेल्या सामाजिक समतेच्या वाटेवर आम्ही चालत आहे. मागासवर्गीय समाजासाठी
शासनाकडून देण्यात आलेला सर्व निधी त्याच कामांवर खर्च करण्यावर आम्ही
विशेष लक्ष देत असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची सर्व प्रक्रीया
ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गिरीश बापट, दिलीप कांबळे, विजय शिवतारे यांचीही भाषणे
झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे
सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी केले. तर आभार समाज कल्याण आयुक्त
पीयुष सिंह यांनी मानले.

“समाजभूषण” पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे

मुंबई येथील मधुकर सदाशिव कांबळे, उमाकांत हरीदास डोईफोडे,
जर्नादन गुणाजी कोंडवीलकर, काशिनाथ बाबूराव निकाळजे,अशोक कृष्णकांत प्रभू, श्री. नरहर रामचंद्र चाफेकर, ऑल्गा पास्कल डिमेलो,
रघुवीर तुकाराम तुरेकर, रायगड जिल्ह्यातील रामदार रघुनाथ धोत्रे, रत्नागिरी जिल्ह्यातील शिलभद्र रामकृष्ण जाधव, नाशिक जिल्ह्‌यातील अशोक गोविंदराव करंजकर, धुळे जिल्ह्यातील सरेश अंबरनाथ लोंढे, श्रीमती रजीया सुलताना शफीयुद्दीन सय्यद, नगर जिल्ह्यातील दीपक गणपतराव साळुंखे,कन्हैय्या गामाजी गिलशेर, नंदुरबार जिल्ह्यातील रोहीतदास शंकर राठोड, पुणे जिल्ह्यातील सावळाराम दादू वानखेडे, अशोकलाल रतनलाल शहा, अजय उर्फ अदिनाथ रंभाजी चांदणे, अप्पा रामचंद्र मोहिते, देवीचंद केसरीमल जैन, सांगली जिल्ह्यातील भिमराव महादेव देसाई,मिलींद लक्ष्मण माने,सातारा जिल्ह्यातील शिवाजी महादेव जाधव, सोलापूर जिल्ह्यातील शिवाजीराव नारायणराव पवार, सुबोध खांडेराव वाघमोडे,प्रभाकर तुकाराम कसबे (गुरुजी), अमरावती जिल्ह्यातील मुरलीधर लक्ष्मणराव पिसे,बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजीराव नवघरे,नानासाहेब शंकरराव कांडलकर, अकोला जिल्ह्यातील भिमराव शंकरराव इंगळे, यवतमाळ जिल्ह्यातील प्रल्हाद भिमराव सिडाम, नागपूर जिल्ह्यातील डॉ. रमेश परमानंद जनबंधू,आनंदराव नारायणराव हवरे, बाबुराव सर्जू वामन,दिलीप रामकृष्ण धोटे, शंकर रजन्याजी वानखेडे,शंकर नथूजी ढेंगरे,राधेश्यामस्वामी पुनाजी शिवले, सौ. रत्नमाला इदल मेश्राम,चिमणलाल बबुजी हाडोती,मनोहर रामप्रसाद अरखेल,इश्वरसिंग रामू नहार, भंडारा जिल्ह्यातील यशवंत महादेव उपरीकर,पुष्पकला संजू मेश्राम, गोंदीया जिल्ह्यातील काशीफ जमा
अब्दुल गफुर कुरेशी,गोविंद कोदूजी मेश्राम,कुसन धुसाजी धासले, औरंगाबाद जिल्ह्यातील खंडोजी शामराव गायकवाड,रविंद्राप्पा काशिनाथ अप्पा साखरे, लातूर जिल्ह्यातील डॉ. संजय देवीदास
जमदाडे, गडचिरोली जिल्ह्यातील फुलचंद बुधाजी रामटेके, कोल्हापूर भास्कर हिंदूराव खांडेकर, जालना जिल्ह्यातील भाऊराव मल्हारी साळवे.