अवयवदान जागृती महाअभियान राज्यभर राबविणार

0
19

अभियानाच्या नियोजनासाठी 4 समित्यांची स्थापना
मुंबई, दि. 18 : समाजात अवयवदानाला चालना मिळावी तसेच गरजूंना वेळेवर आवश्यक अवयव उपलब्ध व्हावेत यासाठी कार्यक्रम हाती घेऊन दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत ‘अवयवदान जागृती महाअभियान’ राबविणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी संयुक्तरीत्या मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
‘अवयवदान जागृती महाअभियान 2016’ च्या लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, आरोग्य विभागाचे संचालक डॉ.मोहन जाधव आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, महाअवयवदान अभियानाच्या जनजागृतीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागासह सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी महसूल,गृह व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. अवयवदानाबाबत प्रबोधन करुन जास्तीत जास्त इच्छित दात्यांना संपर्क
करुन समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याचे तसेच अवयवदानाच्या जास्तीत जास्त नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 साली अमलात आणल्यानंतर आजपर्यंत 11 हजार 364 मूत्रपिंड, 468 यकृत, 19 हृदय व तीन फुफ्फुसांचे तसेच 479 डोळ्यांचे प्रत्यारोपण करुन रुग्णांना नवजीवन देण्यात आले आहे.सद्य:स्थितीत देशभरात सुमारे 5 लाख रुग्ण मूत्रपिंडाच्या, 50 हजार रुग्ण यकृताच्या व 2 हजाराहून अधिक रुग्ण गंभीर हृदयविकाराने त्रस्त असून ते
अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत आहेत, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.

अभियानाचे व्यापक नियोजन करण्यासाठी राज्यस्तरीय समितीसह विभागीय समिती,जिल्हा व तालुका समितीही स्थापण्यात येत आहेत. दि. 15 ऑगस्ट 2016 पासून अवयवदानाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा व तालुका स्तरावर मंगळवार दि. 30 ऑगस्ट रोजी शुभारंभ व अवयवदान जागृती महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवार दि. 31 ऑगस्ट रोजी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यशाळा व चर्चासत्र, चित्रकला, निबंध स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार दि. 1 सप्टेंबर 2016 रोजी अवयवदान दात्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ऑनलाईन अवयवदान नोंदणीकरिता प्रथमच वेब-लिंक सुरु करण्यात आली आहे. विभागीय अवयवदान
प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) सोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत देखील अवयवदानाची ऑनलाईन नोंदणी करता येणे शक्य होणार आहे.

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

या अभियानाचा शुभारंभ मुंबई मरीन ड्राईव्ह येथे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून मंत्रालय परिसरात देखील अवयवदान जागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दि. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान केलेल्या कुटुंबियांचा सन्मान राज्यपाल सी.
विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. महाजन यांनी यावेळी दिली.