देवरीचे ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर

0
31

आदिवासी भागात आरोग्यसेवेची हेळसांडः लोकप्रतिनिधी उदासीन

सुरेश भदाडे

देवरी – एकीकडे राज्यशासन ‘डॉक्टर आपल्या द्वारी’ सारख्या योजना राबवून आदिवासींसाठी अनेक योजना आणत असल्याच्या वल्गना करते. सत्तेतील लोकप्रतिनिधी सुद्धा अनेक विकास कामे खेचून आणल्याचा दावा करतात. दुसरीकडे, मात्र देवरी सारख्या आदिवासी तालुक्यातील आरोग्यसेवाच सलाईनवर ठेवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. देवरीच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी इतरत्र प्रतिनियुक्तीवर पाठवून आदिवासींच्या आरोग्यसेवेला पंगू केले जात आहे. दरम्यान, या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा आरोग्यसेवेबाबत वरिष्ठ अधिकारी अन्यायाचे धोरण राबवीत असताना गप्प बसल्याने कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर देवरीचे ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्याचा विचार केला तर देवरी व चिचगड येथे दोन रुग्णालय आहेत. याशिवाय देवरीच्या रुग्णालयात ट्रामा सेंटरची सुद्धा सोय आहे. या रुग्णालयात दररोज १५०-२०० बाह्यरुग्णांची तपासणी व औषधोपचार होत असल्याची माहिती वैद्यकीय वर्तुळातून दिली जाते. या रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग हा नेहमीच हाउसफुल्ल असतो. राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णालय असल्याचे येथे अपघातातील जखमी सुद्धा औषधोपचारासाठी आणले जातात. याशिवाय देवरीपासून साकोली व आमगाव वगळता शवविच्छेदनाचे कार्य एकट्या देवरी येथे उपलब्ध आहेत. शिवाय फौजदारी प्रकरणातील रुग्णांचा भार सुद्धा या रुग्णालयाला पेलावा लागतो. याशिवाय तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रियेची जबाबदारीसुद्धा याच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते.
रुग्णालयाचा हा संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५ पदे ही कागदोपत्री भरलेली आहेत. या पाच पदांपैकी दोन वैद्यकीय अधिकारी हे उच्चशिक्षणासाठी तर उर्वरित दोन वैद्यकीय अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी डॉ. भोंगाडे यांना चिचगड येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. चिचगडचे डॉ. खरोले हे रजेवर गेले असून त्यांचे परत रुजू होण्यावर शंका व्यक्त केल्या जात आहेत. दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुल्हाणे यांना नवेगाव येथील रुग्णालयाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा पातळीवरून नेहमीच वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीवर देवरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतरत्र हलविण्याचा प्रकार काही नवीन नाही. महत्त्वाचे म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या तिरोडा येथील रुग्णालयापेक्षा देवरी रुग्णालयावर कामाचा ताण अधिक आहे. याशिवाय हा तालुका जंगलव्याप्त असल्याने व इतर भागातून स्थलांतरित रुग्णांचा लोढा जास्त असल्याने या तालुक्यातील आरोग्य सेवेवर नेहमीच ताण असतो.
सध्यःस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. दीपक धुमनखेडे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी सेवेत असून प्रशासकीय कामासोबत त्यांना रुग्णांना सेवा देखील पुरवावी लागत आहे. याशिवाय आंतररुग्ण विभाग, शवविच्छेदन, शस्त्रक्रिया एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. सदर तालुका हा अतिदुर्गम आणि जंगलव्याप्त आहे. येथे रस्ते अपघातांचे प्रकारसुद्धा अधिक आहेत. त्यामुळे या रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे.
असे असताना देवरीसह सालेकसा व आमगाव येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वानवा आहे. त्यामुळे आदिवासी भागातील आरोग्यसेवेला वेठीस धरण्याचा तर हा प्रकार नसावा, अशी शंका व्यक्त होत आहे. या प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प बसल्याने नागरिकांनी कुणाकडे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.