ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन उद्यापासून

0
17

गोंदिया- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी उद्या (ता.२४) पासून काळ्या फिती लावून कामकाज करीत शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे.
दुर्गम भागातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे काम आरोग्यसेवक करीत असतात. परंतु, त्यांची सेवा उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी कमी पडते. ग्रामीण भागात गरोदर महिला, बालके, प्रसूती झालेल्या महिला आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी २००५ पासून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या कर्मचाऱ्यांचे २००६ पासून मासिक मानधन अत्यल्प आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. नोकरीत कायम करण्यात येईल, या आशेवर हे कर्मचारी काम करीत आहेत. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे कर्मचारी-अधिकारी उद्या काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधणार आहेत.