कुष्ठरोग शोध अभियान 19 सप्टेंबरपासून 16 जिल्ह्यांत राबविणार  – डॉ. दीपक सावंत

0
7

berartimes.com,  मुंबई, दि. 16 : त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान 2016-17 राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये दि. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2016 या कालावधीत प्रभावीपणे राबविणार असून ‘झीरो लेप्रसी मोहिम’ यशस्वी करणार,
अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

            आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्याचे निर्देश आहेत.समाजातील संशयित कुष्ठरुग्ण या अभियानाच्या कालावधीत शोधून निश्चित निदानझालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे हा या अभियानाचा उद्देश आहे. भारतातील 13 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 163 जिल्ह्यांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे.
            राज्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या गडचिरोली,चंद्रपूर, वर्धा, भंडारा,गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ,नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, ठाणे, रायगड व पालघर या 16 जिल्ह्यांत हे अभियान राबविले जाईल. या अभियानामध्ये 169 तालुके,  14 महानगरपालिका व 88 नगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पालघर व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पल्स पोलिओ कार्यक्रम असल्याने या ठिकाणी 13 ऑक्टोबर 2016 पर्यंत या अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
            तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर अधिकारी व कर्मचारी यांना या अभियानाबाबतची माहिती देण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर विविध समित्यांची स्थापना करुन या अभियानाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण 4 कोटी 98 लाख एवढ्या लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 1 कोटी 53 लाख शहरी भागातील व 3 कोटी 45 लाख ग्रामीण भागातील लोकसंख्येचे उद्दिष्ट आहे.
            हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्च टीम्स, सर्वेक्षणसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून या टीममधील सर्व सदस्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या टीममार्फत अभियानाच्या कालावधीमध्ये 14 दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व त्वचारोगासंदर्भात शारिरीक तपासणी करण्यात येणार असून संशयित रुग्णांची यादी तयार करुन त्यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान झालेल्या कुष्ठरुग्णांवर मोफत बहुविध औषधोपचार करण्यात येणार आहेत. अभियानांतर्गत निदान झालेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येणार आहे. गाव पातळीवर व शहरी भागात बॅनर्स, पोस्टर्स, लाऊड स्पिकर या माध्यमातून शालेय विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे व अलर्ट इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाने या अभियानाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरुन सनियंत्रण व पर्यवेक्षणाकरिता अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्ष सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. जिल्हांमध्ये अभियानासंबंधी
काही समस्या उद्‌भवल्यास मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

            हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या पथकाला संपूर्ण सहकार्य करुन कुष्ठरोगाविषयी संपूर्ण माहिती द्यावी,अभियानांतर्गत आढळून आलेल्या संशयितांनी पुढील तपासणीसाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, अभियानात कुष्ठरोगाचे निदान झालेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांनी एक दिवसाचा प्रतिबंधात्मक औषध उपचार घ्यावा, तसेच कुष्ठरोगाबाबत सांगितलेल्या माहितीचा उपयोग जनजागृतीसाठी करावा, असे आवाहनही डॉ.सावंत यांनी यावेळी केले.