राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये ४७ टक्के घट-आरोग्यमंत्री सावंत

0
11
  • जुलै आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
  • नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर येथे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण
  • चिकनगुनिया बाबत एनआयव्ही संस्था अभ्यास करणार

मुंबई, दि. १६ : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा आरोग्य विभागामध्ये असून या आजारांसाठी चाचणी करतांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल. राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्यावर्षी पेक्षा ४७ टक्के घट झाली असल्याचे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आजाराच्या सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी साथरोग नियंत्रण समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते.

राज्यात ऑगस्ट २०१६ अखेर मलेरियाचे १५ हजार ९२१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३० हजार २२३ एवढी होती. आरोग्य विभागाने मलेरिया प्रतिबंधक मोहिम हाती घेतल्याने यावर्षी मलेरिया रुग्णांच्या संख्येत ४७ टक्के घट झाली आहे. साथरोग नियंत्रणाच्या कामगिरीमध्ये राज्य शासनाने अन्य राज्यांच्या तुलनेत समाधानकारक कामगिरी केली असून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २५८२ असून मुंबई शहरातील रुग्णांची संख्या १२२ आहे. राज्यात आढळून आलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये शहरी भागात १६७२ रुग्ण तर ग्रामीण भागात ९०० रुग्ण आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर येथे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आणि डेंग्यू सदृश रुग्ण यामध्ये तफावत आहे. डेंग्यू सदृश रुग्ण देखील डेंग्यूचे रुग्ण म्हणून जाहीर करू नका, असे आवाहन खासगी रुग्णालयांना करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होऊ शकते. आयजीएम ॲण्टीबॉडीजची चाचणी सात दिवसांमध्ये पॉझिटिव्ह आली तरच तो रुग्ण डेंग्यूचा म्हणून जाहीर करणे योग्य राहील, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डेंग्यूवरील औषधांचा साठा राज्यात पुरेसा असून नागरिकांना घाबरून जाऊ नये. डेंग्यूसाठीच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळा जास्तीचे दर आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात चिकनगुनियाचे ४३९ रुग्ण आढळून आले असून त्यातील ९० टक्के रुग्ण हे पुणे शहर व ग्रामीण भागात आढळेले आहेत. पुणे शहरातील ठराविक भागातच रुग्ण आहेत. चिकनगुनियाचे रुग्ण का जास्त प्रमाणात आढळून येताहेत याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) या संस्थेस अभ्यास करायला सांगण्यात आले आहे. ज्या भागात चिकनगुनियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहेत तेथे पुणे महापालिकेने स्वच्छता आणि बांधकाम सुरू असलेल्या जागांची तपासणी मोहिम हाती घ्यावी,अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.