पाणी, वीज, मालमत्ता कर,वीजबिलासाठी 500,1000 च्या नोटा स्वीकारणार

0
8

मुंबई, दि. 10 : केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या चलनी नोटा 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी देण्याची विनंती राज्याने केंद्र शासनाकडे केली होती. ही विनंती केंद्र शासनाने मान्य केल्याने जनतेची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तशा सूचना महावितरणसह संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल टॅक्स (पथकर) 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय कालच (दि.9) घेण्यात आला आहे. त्यात मुंबईत येणारे एन्ट्री पॉईंट्स आणि मुंबई शहरातील टोलनाक्यांचा सुद्धा समावेश आहे. मुंबई मेट्रोला 500 आणि 1000 रूपयांचे चलन स्वीकारण्याचे आदेशही कालच देण्यात आले होते. त्याप्रमाणे आता कार्यवाही देखील सुरू आहे. संबंधित निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त
सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शासकीय बिलांचा भरणा जुन्या नोटांद्वारे करण्यासंदर्भात निर्णय घेऊन जनतेस दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आता चलनाच्या समस्येमुळे सामान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
बँक आणि पोस्टामध्ये 500 व 1000 रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राहणार असून त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करुया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.