एक्साईजमध्ये उपनिरीक्षकांच्या ४०० जागांची भरती

0
8

गोंदिया,दि. 17 : राज्य उत्पादन शुल्क खात्यातील रिक्त पदांची पोकळी भरुन काढण्यासाठी उपनिरीक्षकांच्या तब्बल ४०० जागांची भरती घेतली जाणार आहे. यासंबंधी मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. एक्साईजमध्ये यापूर्वी १९७९ ला राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक पदाची थेट भरती घेण्यात आली होती. त्यानंतर या पदाची मोठ्या संख्येने भरती घेतली गेली नाही. मध्यंतरी १९९८ मध्ये प्रकल्पग्रस्त व तत्स्म उमेदवारांकरिता उपनिरीक्षकाच्या केवळ ४८ जागांची भरती घेण्यात आली होती. आता ४०० पदांच्या होऊ घातलेल्या भरतीकडे एक्साईजमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पाल्य तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या नजरा लागल्या आहेत.

एक्साईजला सध्या नागपूर येथे उपायुक्ताचे पद आहे. मात्र या अधिकाऱ्याकडे तब्बल ११ जिल्ह्यांची जबाबदारी येत असल्याने प्रशासन सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ही बाब ओळखून अमरावतीला पाच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र उपायुक्तांचे पद मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. एक्साईज आयुक्तालय या पद मंजुरीसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते.