चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान

0
6

मुंबई दि. १८  – महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्यांना राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसरे स्थान देण्यात आले आहे.

सामान्य प्रशासन विभागाने आज या बाबतचे परिपत्रक जारी केले. पाटील हे विधानपरिषदेत सत्तारुढ पक्षाचे नेते आहेत. एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असेपर्यंत विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसत असत. आता त्या जागी चंद्रकांत पाटील बसणार आहेत. पाटील यांचे महत्त्व वाढविताना मराठा फॅक्टर लक्षात घेण्यात आल्याचे मानले जाते.

पाटील हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे ते निकटवर्ती मानले जातात. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महत्त्वाचे महसूल खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले. फडणवीस मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री कोण हा प्रश्न खडसेंच्या राजीनाम्यानंतर अनुत्तरित होता. मुख्यमंत्र्यांनी आता चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्याचे उत्तर दिले आहे. आता ते मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसतील.