नागपूर ,दि.२८ :: शासन कुशल मनुष्यबळ निर्माण करून स्वयंरोजगारास चालना देण्याकरिता कौशल्य विकासाच्या विविध योजना राबवीत आहे. दुसरीकडे भारतीय कला संस्कृतीचा वारसा जपणारा पिढीजात कुंभार कारागीर आपल्या हक्काच्या मातीपासून वंचित राहत आहे. ज्यांचे जगणेच मातीवर अवलंबून आहे, त्या कुंभार समाजाला आज मातीसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या व्यवसायासाठी मातीच मिळेनासी झाली आहे. त्यांच्या व्यवसायाला मदत व्हावी म्हणून सरकारने मातीच्या खाणीसाठी गावागावात जमिनी आरक्षित केल्या होत्या. मात्र अतिक्रमणामुळे मातीच्या खाणीसाठी आरक्षित केलेल्या जमिनी सरकारी रेकॉर्डवरून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कुंभार समाजाला मातीची कमतरता भासू नये व त्यांचा वर्षभर चालणारा व्यवसाय टिकून राहावा यासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागातर्फे १९९८ ला एक परिपत्रक काढून गावागावात मातीच्या खाणीसाठी जमीन आरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. कुंभार समाजाला व्यवसायासाठी जमिनीची मागणी असल्यास अग्रक्रमाने मंजूर करण्याचा स्पष्ट उल्लेख परिपत्रकात होता. यासाठी प्रत्येक गावात २ ते १५ एकर जागा आरक्षित करण्याचे व ही जागा कुंभार समाजाला उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र शासकीय स्तरावरील उदासीनता म्हणजे एकाही गावात या समाजाला मातीखाणीची जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. कुंभार समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र कुंभार महासंघाने २३ मार्च २०१२ ला माहिती अधिकारांतर्गत मातीखाणीची माहिती विचारली असता त्याहून धक्कादायक बाब समोर आली. मंडळ अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील एकाही गावात कुंभार मातीखाणीची राखीव जागा शासकीय रेकॉर्डवर उपलब्ध नसल्याची माहिती या विभागांनी दिली आहे. केवळ नागपूर जिल्ह्यात नव्हे तर हाच प्रकार संपूर्ण राज्यात असल्याचे कुंभार महासंघाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासकीय रेकॉर्डवरील खाणी गेल्या कुठे? या जागांवर कुणी अतिक्रमण केले? असे अनेक प्रश्न समाजाला पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथे ६ एकर, वळद येथे ४ एकर, गोंदिया जिल्ह्यातील सरांडी येथे ३.५ एकर, नागपूरच्या पारशिवनी येथे ३.५ एकर तर अहमदनगरच्या टाकळी भान येथे १५ एकर जागेत खाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यावर कुंभार समाज व्यवसाय करीत आहे. मग इतर ठिकाणाच्या कुंभारखाणी गेल्या कुठे, हा यक्षप्रश्न आहे.





